नवी दिल्ली : पॅरिस पॅरा ऑलिम्पिक २०२४ मध्ये अजीत सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. अजीतने शेवटच्या क्षणी ६५.६२ मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करून रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, भालाफेक क्रीडाप्रकारात भारताने एकाचवेळी दोन पदके जिंकले आहेत. अजीत सिंग याने रौप्य पदक तर सुंदर गुर्जरने(६४.९६ मीटर) कांस्यपदक जिंकले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, पॅरा ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकून अजित सिंग याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खेळाप्रती त्याची बांधिलकी आणि चिकाटीचा भारताला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकल्याबद्दल अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांचे हार्दिक अभिनंदन. या खेळांमधील सुमित अंतिलच्या सुवर्णपदकानंतर भालाफेक स्पर्धांमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये चमक आणली आहे. त्यांनी येणाऱ्या काळात आपल्या देशाला अधिक वैभव प्राप्त करून द्यावे अशी माझी इच्छा आहे, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या आहेत.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुरुवातीपासूनच स्पर्धात्मक असल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेदरम्यान अजीत, रिंकू आणि सुंदर यांनी त्यांच्या मोहिमेची सुरुवात अनुक्रमे ५९.८० मीटर, ५७.३४ मीटर आणि ६२.९२ मीटर भाला फेकत केली. अजीतच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याला ६०.५३ मीटर फेकून तिसऱ्या स्थानावर येता आले. तर सुंदरने सुरुवातीला क्युबाच्या गिलेर्मोला मागे टाकत दुसरे स्थान पटकाविले.