पवारांनी टोचले ठाकरेंचे कान! मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्यावरुन केली स्पष्ट भूमिका
04-Sep-2024
Total Views |
कोल्हापूर : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीही कारण नाही, असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचे कान टोचले आहेत. बुधवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत वाद सुरु असल्याच्या चर्चा आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, अशी उबाठा गटाची ईच्छा आहे. संजय राऊतांकडून वारंवार तसे संकेतही देण्यात आलेत. मात्र, आता शरद पवार आणि काँग्रेसने यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीही कारण नाही. अनेकदा नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूकीनंतर संख्याबळानुसार ठरवलं जातं. आज कशाचा काही पत्ता नाही. आम्हाला बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात शंका नाही. पण त्यासाठी आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. शक्यतो ७, ८, ९ तारखेला आमचा राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्ष एकत्र बसतील आणि जागावाटपाबाबत चर्चा होईल," असे ते म्हणाले.