शेतकरीसुद्धा लाडका आहे हे सरकारने...; मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर राज ठाकरेंची मागणी

04 Sep 2024 13:53:34
 
Raj Thackeray
 
मुंबई : शेतकरीसुद्धा लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावं, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसंदर्भात राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि तेदेखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं."
 
हे वाचलंत का? -  लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मविआतील नेत्यांना आवाहन
 
"तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनीदेखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते आणि ती सुकायला वेळ लागतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वचजण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे, अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे. किमान त्यानिमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "या सगळ्यात सरकारने पण अजिबात मदतीचा हात आखडता घेऊ नये आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं," अशी मागणीही त्यांनी सरकारला केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0