"मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालंय!"

नितेश राणेंची खोचक टीका

    04-Sep-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : शरद पवारांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालं आहे, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. यावरून आता राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
 
नितेश राणे म्हणाले की, "शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी आता फक्त मुजरा करून यायचे बाकी राहिलेत. बाकी सगळं करून ते आलेत. आतासुद्धा शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यानेच जर अशी भूमिका घेतली असेल तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालेलं आहे," अशी टीका त्यांनी केली.
 
हे वाचलंत का? -  पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचा दुजोरा! मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंची कोंडी?
 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत मोफत सोडण्यात आलेल्या मोदी एक्स्प्रेसला त्यांनी झेंडा दाखवला. पुढे बोलताना ते म्हणाले की, "भाजप ५ ट्रेन सोडत असतील तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किमान ६ ट्रेन तरी सोडाव्या. त्यांनी आमच्याशी सकारात्मक स्पर्धा करावी. पण आतापर्यंत ते केवळ टीका करून पोटं भरण्याचं काम करत आहेत. फक्त भाजप आणि महायूतीच्या घटक पक्षांनीच रस्त्यावर उतरून महाराष्ट्राची सेवा केली आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूसकीचा धर्म आहे. पण महाविकास आघाडीचे लोक टीका करणं आणि घाणेरडं राजकारण सोडून दुसरं काहीही करत नाहीत," असेही ते म्हणाले.