मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतच्या शरद पवारांच्या भूमिकेला आता नाना पटोलेंनीही दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आताच विचार करण्याचं काहीही कारण नाही, असे शरद पवार म्हणाले होते. हे बरोबर असल्याचे पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले की, "शरद पवार बरोबरच बोलले आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यानंतरच आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या बैठकीत विषय मांडला. त्यावेळी आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ, असा निर्णय झाला होता," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सीबीआयकडून गुन्हा दाखल
काय म्हणाले शरद पवार?
"मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीही कारण नाही. अनेकदा नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूकीनंतर संख्याबळानुसार ठरवलं जातं. आज कशाचा काही पत्ता नाही. आम्हाला बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात शंका नाही. पण त्यासाठी आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. शक्यतो ७, ८, ९ तारखेला आमचा राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्ष एकत्र बसतील आणि जागावाटपाबाबत चर्चा होईल," असे ते म्हणाले.