अखेर कोपरी सॅटीसबाधित

२६ कुटुंबांना बीएसयुपीमध्ये घरे.. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांचा वनवास संपला

    04-Sep-2024
Total Views |

kopri
 
 
ठाणे, दि.०४ : प्रतिनिधी : ठाणे पूर्व येथील कोपरी सॅटीस प्रकल्पात बाधित कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. या प्रकरणी तातडीने पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसयुपी योजनेत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्यांना पत्रे मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
 
आमदार संजय केळकर यांनी आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबीयांना पत्रे दिली. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते.
 
२० दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. कोपरी येथील सॅटीस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्षे पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी आ.केळकर यांनी या कुटुंबांना तातडीने घरे मिळण्याबाबत निर्देश दिलेच शिवाय स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही केली होतीया बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीने या कुटुंबांना घरे देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या. या लाभार्थ्यांना बीएसयुपी योजनेत घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली. आज शासकीय विश्रामगृहात य लाभार्थ्यांना पत्रे देण्यात आली. अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्याने या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.
 
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन वेळीच झाले नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत. अशा अनेक बाधित कुटुंबांना घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आ. केळकर म्हणाले.
 
सी पी तलावच्या कचऱ्याची दुर्गधी
 
सी पी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली. रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा, जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही, असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले. नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे. लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल, अशी माहितीही आ.केळकर यांनी पत्रकारांना दिली.
 
घनकचरा प्रक्रिया केंद्र कार्यकर्ते बंद पाडणार
 
लोढा आमारा येथील घन कचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटी नियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. महापालिकेने ठेकेदारास नोटीस बजावली आहे. तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजपा कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील,असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिला.