लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मविआतील नेत्यांना आवाहन

    04-Sep-2024
Total Views |
 
Fadanvis
 
लातूर : लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केले आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या प्रमुख उपस्थितीत लातूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. आपल्याला २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा असल्यास केवळ नारी शक्तीला देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानून योजना तयार करू. त्याचवेळी आपला देश सशक्त देश होऊ शकेल. यातूनच पंतप्रधान मोदींनी लखपती दीदीपासून तर बेटी बचाओ बेटी पढाओपर्यंत योजना सुरु केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही महिला सक्षमीकरणाच्या योजना सुरु झाल्या. यात लेक लाडकी योजना, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत, महिलांना तीन मोफत सिलेंडर आणि लाडकी बहिण योजना यासारख्या अनेक योजना राबवण्यात आल्या," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का -  पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट; दिल्ली पोलिसांकडून रिपोर्ट सादर
 
ते पुढे म्हणाले की, "एकीकडे आम्ही आमच्या बहिणींना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतू, काही लोकांना तेसुद्धा पाहावत नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्यासाठी ते हायकोर्टात गेले. पण कोर्टात गेलेला हा व्यक्ती काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या निकटवर्तीय आहे, याचं दु:ख आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, लाडकी बहिण योजनेला राजकीय चष्म्यातून पाहू नका. तिला विरोध करू नका. ही योजना आपल्या सगळ्या बहिणींसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना याचं मोल माहिती आहे. काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.