योगाने स्वास्थ्यपूर्ती

    30-Sep-2024
Total Views |
yoga mental health strength
 
याआधीचे 14 लेख आपण विहार म्हणजे कर्म करताना पाळावयाचे यम व नियम, जे योगशास्त्रातील अष्टांगापैकी पहिले दोन अंग आहेत, त्यांवर खर्च केले. ते आपले जीवनात उतरविण्याचा संकल्प करून कर्मशुद्धी साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत, आसनांना सुरुवात करुन स्वास्थ्यप्राप्ती करून घ्यायची असते. त्याकरिता स्वास्थ्य म्हणजे काय, हे पहिले समजून घेऊया. स्वास्थ्याच्या अनेक व्याख्या आहेत. पैकी काही अशा :


समदोष, समाग्निश्च समधातुमला क्रियाः।
प्रसन्न आत्मनिन्द्रिय मनः स्वास्थ्य इत्यभिधीयते॥ - वाग्भट
The World Health Organization (WHO) defines health as a state of complete physical, mental, and social well-being and not merely the absence of disease or infirmity


जागतिक आरोग्य संघटना (WHO) आरोग्याची व्याख्या पुढीलप्रमाणे करते. त्यानुसार, केवळ रोग किंवा अशक्तपणाची अनुपस्थिती नाही, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती म्हणून आरोग्याकडे पाहिले जाते.

योगशास्त्र स्वास्थ्यासाठी शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलित लक्ष आपल्यासमोर ठेवते. ते अवलंब करण्यास जास्त प्रायोगिक ठरते. शरीराचे स्वास्थ्य आसनांनी, मनाचे प्राणायाम करुन व आत्म्याचे ध्यानाचा अभ्यास करून साधता येते. आत्म्याच्या अभ्यासात ‘सर्वा भूती परमेश्वर’ ही संकल्पना समाविष्ट असल्याने समाजस्वास्थ्यासाठीचे प्रयत्न तेथे अंतर्भूत आहेत. म्हणून सर्वांगीण स्वास्थ्य साधण्यास योगशास्त्र अत्यंत उपयुक्त आहे. सुरुवातीला आपण आसनांचाच विचार करणार आहोत. क्रमशः प्राणायाम व ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी आधी ‘प्रत्याहार’ व ‘धारणा’ या अंगांचा अभ्यास करावा लागेल.

आसन म्हटले की शरीरस्वास्थ्य आले. शरीरात अनेक संस्था प्राकृतिकरित्या आपल्या प्रयत्नांशिवाय सुरू असतात. त्यांतील प्रमुख संस्था म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पाचन व उत्सर्जन. शरीर हे एक यंत्र आहे, असे मानल्यास ते सुरळीत चालण्यास या चार संस्था कारणीभूत आहेत. मग इतर संस्था या आपोआपच व्यवस्थित चालतील. त्यात बिघाड झालाच, तर योगोपचार अभ्यासावा लागतो.
पण, आसन केले आणि स्वास्थ्य आले असे होत नाही. त्याला आहार, विहार आणि पथ्ये यांची जोड द्यावी लागते. पैकी प्रकृतीनुसार, ऋतुनुसार आहाराची पद्धती वैद्याकडून समजून घ्यावी. विहार म्हणजे कर्म करताना यम, नियमांचे पालन करावे व पथ्य म्हणजे :

1) कोणतेही आसन पुस्तकात पाहून किंवा चित्र बघून करू नये.
2) ते अनुभवी व तज्ज्ञ योगशिक्षकांकडून समजून घेऊन त्यांच्या निगराणीखाली करावे.
3) कोणतेही आसन प्रथमतः पूर्ण करू नये. प्रथम अर्धे आसन शिकावे, त्याचा सराव झाला की पूर्ण आसनाकडे जावे.
4) आसने करण्याच्या तीन तास आधी काही खाल्लेले नसावे. नंतर अर्धा ते एक तास काहीही खाऊ नये.
5) परिणाम मिळण्यासाठी आसन 90 ते 180 दिवस अभ्यासावे.
6) आसने करताना स्थिती, गती, मती, क्रम आणि दिशा अशी शिस्त पाळावी.
या सर्वांचा अभ्यास आपण क्रमशः या लेखमालेत करू.
॥कल्याणमस्तु॥
 
डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
9730014665