राज्यात टाटा पॉवर १.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

    30-Sep-2024
Total Views |
tata power investment ev charging station


नवी दिल्ली : 
  टाटा पॉवर राजस्थानमध्ये मोठी गुंतवणूक करणार असून पीएम सूर्य घर योजनेची मदत मिळणार आहे. टाटा पॉवर तब्बल १.२ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे. टाटा पॉवरने ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राजस्थान सरकारसोबत प्रारंभिक करार केला आहे. यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांच्या ग्रीन एनर्जीमधील गुंतवणुकीचा समावेश आहे. राजस्थानमध्ये एक लाख ईव्ही चार्जिंग पॉइंट्स उभारण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली आहे.




टाटा पॉवरने गुंतवणुकीच्या माध्यमातून १० वर्षांच्या योजनेचे उद्दिष्ट राजस्थानला वीज अधिशेष राज्यामध्ये बदलण्यात मदत करणे आणि चोवीस तास स्वच्छ, परवडणारी आणि विश्वासार्ह वीज पुरवठा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गुंतवणूक अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि उत्पादन, पारेषण, वितरण, अणुऊर्जा, छतावरील सौर संयंत्रांची स्थापना आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगमध्ये केली जाईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘रायझिंग राजस्थान’ गुंतवणूकदार परिषदेदरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पॉवर ग्रीड पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, उर्जेची हानी कमी करण्यासाठी आणि संपूर्ण राज्यात वीज गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य पारेषण आणि वितरण क्षेत्रात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याव्यतिरिक्त, अणुऊर्जा प्रकल्प विकसित करण्याच्या संधी शोधण्याबरोबरच पारेषण प्रणालीसाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. सुमारे ७५ हजार कोटी रुपये अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी असणार आहेत.