मुंबई : ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच, या चित्रपटात मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं होतं. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या गाण्यातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण तुम्हाला माहित आहे काचित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत असेल अशी अपेक्षा होती. पण, 'देवरा' त जान्हवीने मुख्य भूमिका साकारलेली नाही.
'देवरा' चित्रपटात प्रमुख भूमिकेत ज्युनियर एनटीआर असून या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेदेखील झळकली आहे. श्रुतीने यात मुख्य भूमिका साकारली आहे. ज्युनियर एनटीआरच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती मराठे असून श्रुतीला साऊथच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
'देवरा' मध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. जान्हवी कपूर जरी ज्युनियर एनटीआरबरोबर दिसत असली तरी ती स्क्रीनवर फार कमी वेळ दिसते. चित्रपटाच्या मध्यांतरानंतर जान्हवीची 'देवरा'मध्ये एन्ट्री होते. 'देवरा'त ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत असून त्याने देवरा आणि वरा अशा दोन भूमिका साकारल्या आहेत. श्रुतीने देवराच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर वरा या देवराच्या मुलाच्या प्रेमात जान्हवी असल्याचे दाखवले आहे. आता 'देवरा : पार्ट २' मध्ये जान्हवीची मोठी भूमिका दिसू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 'देवरा'ने पहिल्या दिवशी ८२.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३८.२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३९.९ कोटींची कमाई करत आतापर्यंत देशात १६२.२४ कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.