शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १२७२.०७ अंकांनी घसरण
विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीकडे कल; ऑटो आणि बँकिंग सेक्टरमधील समभागांचा समावेश
30-Sep-2024
Total Views |
मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स तब्बल १२७२ अंकांनी घसरला असून निफ्टीदेखील २६ हजारांच्या खाली बंद झाला आहे. आज भारतीय शेअर बाजारात ऑटो आणि बँकिंग सेक्टरमधील समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. विक्री सत्रामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराचे बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद होताना दिसले. बीएसईचा सेन्सेक्स १२७२.०७ अंकांनी १.४९ टक्क्यांनी घसरून ८४,२९९.७८ वर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी-५० ३६८.१० अंकांसह १.४१ टक्क्यांनी घसरत २५,८१०.८५ वर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री आहे, असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
बाजारातील घसरणीचे कारण म्हणजे अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष जेरोम पॉवेल धोरणात्मक व्याजदरांवर भाषण देण्याची शक्यता आहे. तसेच, भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा कल राहिला असून उत्पादन आणि सेवांवरील आयएसएम सर्वेक्षण अमेरिकेत प्रसिद्ध होणार आहेत, या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. याचाच परिणाम म्हणून शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.