मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार 'दिवाळी गिफ्ट'!

    30-Sep-2024
Total Views |
government-employees-will-get-diwali-gift-government


मुंबई :   
केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता(डीए) वाढविण्याच्या तयारीत असून मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीए आणि डीआर या दोन्हींमध्ये ४ टक्क्यांची वाढ करणार आहे. महागाई भत्ता वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते.

दरम्यान, दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसून सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली होती.


पगार किती वाढणार?

महागाई भत्त्यांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. डीएनए रिपोर्टनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार १८ हजारांपर्यंत आहे, त्यांच्या पगारात दरमहा ५४० ते ७२० रुपयांची वाढ होऊ शकते. तसेच, १८ हजार रुपयांच्या मूळ पगारासह ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या ९ हजार रुपये डीए मिळतो, जो मूळ वेतनाच्या ५० टक्के आहे. महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्यास तो ९५४० रुपये होईल, तर ४ टक्के वाढ झाल्यास तो दरमहा ९७२० रुपये होईल.