आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिरसाटांचे गंभीर आरोप

    30-Sep-2024
Total Views |
 
Sanjay Shirsat
 
मुंबई : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच आनंद दिघेंची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
 
संजय शिरसाट म्हणाले की, "शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत होत्या. एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्या, असं पोलिसांनी स्वत: सांगितलं होतं. पण त्या फाईलवर सही केली गेली नाही. कारण त्यांना एकनाथ शिंदेंना शहीद करायचं होतं. परंतू, एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. म्हणून या सगळ्यातून ते स्वत: उभे राहिलेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्रात 'माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली' म्हणणारे नेते...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठावर हल्लाबोल
 
आनंद दिघेंना मारलं गेलं!
 
ते पुढे म्हणाले की, "आनंद दिघेंना मारलं गेलं, हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहित आहे. त्यांचा दुपारी डिस्चार्ज होणार होता. मग ते अचानक कसे काय मरतात? त्या हॉस्पिटलला आग लागली होती. तिथे हजारों पेशंट होते. त्यांना वाचवण्याचं काम शिवसैनिकांनी केलं होतं. त्यात शिंदे साहेब अग्रस्थानी होते. या सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील. दिघे साहेब मोठे होतील म्हणून त्यांचे हात छाटण्याचे प्रयत्न सुरु झाले. आपल्यापेक्षा कुणीही मोठं होऊ नये म्हणून योजना आखणारे लोकं आजही त्या पक्षात आहेत. तिथे मोठे होणारे चालत नाहीत तर पाय चेपणारे चालतात," असा आरोप त्यांनी केला आहे.