मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Gomata Rajyamata) महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला (देशी गाय) 'राज्यमाता' म्हणून घोषित करणारा आदेश जारी केला आहे. राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती, गोमूत्र आणि सेंद्रिय शेती पद्धतीचे महत्त्व लक्षात घेता शासनाने गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे.
आदेशात दिलेल्या माहितीनुसार, प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या देशी गायींच्या जाती आढळत असून दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सदर बाब लक्षात घेता पशुपालकांनी देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस राज्यमाता-गोमाता घोषित करण्याचा निर्णय शासमाने घेतलेला आहे.