मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. त्यात AI आल्यापासून काहीजणं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आहेत तर काही जणं चुकीचा वापर करताना दिसत आहेत. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशातच आता ५०० रुपयांच्या नोटेवर चक्क महात्मा गांधींच्या फोटोऐवजी अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ खेर यांनी स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करून आश्चर्य व्यक्त केले आहे.
अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटेवर बापूंऐवजी त्यांचा फोटो छापला असल्याचे दाखवले जात आहे. हा प्रकार गुजरात येथे घडला, तिथे या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पण त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “घ्या बघा.... ५०० रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकते.”
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील ५०० ची नोट पाहिल्यानंतर नोट अगदी खऱ्या नोटेसारखीच दिसत होती. अगदी नोटेच्या डिझाइनपासून ते रंग आणि आकारापर्यंत सगळ्या गोष्टी तंतोतंत होत्या. पण नोटेवर महात्मा गांधीच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो तर 'रिजर्व बॅंक ऑफ इंडिया'च्या जागी 'रिसोल बॅंक ऑफ इंडिया' असं लिहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद पोलिसांनी अशा अनेक नोटांचे बंडल जवळपास १ कोटी ६० लाख रुपये जप्त केले आहेत.