तृणमूलच्या महिला आमदार न्याय मागणाऱ्या डॉक्टरांना म्हणाल्या 'कसाई', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

    03-Sep-2024
Total Views |
trinamool-mla-lovely-maitra-calls-protesting-doctors-butchers
 
नवी दिल्ली :       देशभरातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडक कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच टीएमसी प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडले असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदार आणि अभिनेत्री लवली मैत्रा यांनी डॉक्टरांना कसाई म्हणताना दिसत आहेत. त्या स्टेजवरून कसाई म्हणतानाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांना संरक्षण मिळावे व दोषीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. दरम्यान, ममता सरकारने बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडले असले तरी दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांची अर्वाच्य भाषा थांबत नसल्याचे चित्र आहे.
टीएमसी आमदार अरुंधती मैत्रा उर्फ ​​लवली मैत्रा म्हणाल्या, ते(डॉक्टर) निषेधाच्या नावाखाली काय करत आहेत? ग्रामीण भागातून आलेल्या गरिबातील गरीबांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. ते सध्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवेअभावी त्रस्त असून त्यांच्यावर कोणताही उपचार होत नाही. त्यांच्यात माणुसकी आहे का? ही माणसं माणसं आहेत का? डॉक्टर आता कसाई बनत आहेत, अशा आशयाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात सोनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाल यांनी लवली मैत्राचा व्हिडिओ शेअर करून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीएमसी आमदार लवली मैत्रा यांनी आंदोलक डॉक्टरांची तुलना कसायांशी केली आहे. ती कोलकाता पोलिसातील आयपीएसची पत्नी देखील आहे, जी डॉक्टरांना नोटीस आणि समन्स बजावत आहे. आंदोलक डॉक्टरांबद्दल एवढा द्वेष का? ते ममता सरकार आणि पोलीस दलाला जबाबदार धरत आहेत म्हणून? उदयन गुहा अरुप चक्रवर्ती कुणाल घोष आता लवली मैत्रा! टीएमसी त्यांना बडतर्फ करेल की त्यांचा बचाव करेल, जसे की त्यांनी डॉ. संदीप घोष यांचा बचाव केला होता?, अशी पोस्ट एक्सवर केली आहे.