‘आयसी ८१४’प्रकरणी नेटफ्लिक्सची माघार, दहशतवाद्यांची खरी नावे दाखवणार
03-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : ‘आयसी ८१४ – द कंदाहार हायजॅक’ वेबसिरिजप्रकरणी नेटफ्लिक्सने आपली चूक मान्य करून माघार घेतली आहे. वेबसिरिजच्या प्रारंभीच दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला आहे. ‘आयसी ८१४ – द कंदाहार हायजॅक’ या वेबसिरिजीमध्ये मुस्लिम दहशतवाद्यांना हिंदू नावे देण्याचा अतिशय गंभीर प्रकार घडला होता. देशभरातून त्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेटप्रमुख मोनिका शेरगिल यांना पाचारण केले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयातील सचिव संजय जाजू यांची त्यांन भेट घेतली. यावेळी जाजू यांनी वेबसिरिजविरोधात देशात असलेल्या रोषाची जाणीव शेरगिल यांना करून दिली. अशाप्रकारच्या राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील विषयांचे चित्र करताना भान ठेवावे, असेही शेरगिल यांना सुनावण्यात आले आहे.
बैठकीनंतर नेटफ्लिक्सने माघार घेऊन आपली चूक मान्य केली. शेरगिल त्याविषयी म्हणाल्या, “इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ८१४ च्या १९९१ सालच्या अपहरणाबद्दल अपरिचित असलेल्या दर्शकांसाठी, अपहरणकर्त्यांची खरी आणि कोड नावे समाविष्ट करण्यासाठी सुरुवातीचे अस्वीकरण अद्यतनित केले गेले आहे”, असे शेरगिल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सनी अहमद काझी, शाकीर, मिस्त्री जहूर इब्राहिम, शाहिद अख्तर सय्यद, इब्राहिम अथर या पाकिस्तानी मुस्लिम दहशतवाद्यांची नावे वेबसिरिजमध्ये दिसणार आहेत.