मुंबई : ‘मराठा क्षत्रीय विद्यावर्धक मंडळा’चा 107वा वर्धापन दिन व गुणगौरव सोहळा दि. 31 ऑगस्ट रोजी कै. सहदेवराव लक्ष्मण शेलटकर सभागृह, भांडुप येथे संपन्न झाला. सालाबादप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते. श्री. व सौ. हरिश्चंद्र वस्त यांनी पूजन केले. या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आरवली टांक, शिरोडा-वेंगुर्ला गावाचे भूमीपूत्र भालचंद्र विश्वनाथ वस्त (एस्सार स्टीलउद्योग समूहात, वित्त विभागात, उपमहाव्यवस्थापक), हे उपस्थित होते. त्यांनी ‘नवयुवकांसमोर उभी असलेली विविध क्षेत्रांतील आव्हाने त्यासाठी आवश्यक स्वयंसिद्धता’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी सन 2023-24 या वर्षातील माध्यमिक शालांत परीक्षेत 75 टक्के व उच्च माध्यमिक परीक्षेत 65 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या व पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे भालचंद्र विश्वनाथ वस्त आणि संस्थेचे विश्वस्त केशव चोपडेकर, गणेश मित्र, शंकर पोसम, गुरुदास चोपडेकर, संदीप शेलटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यात कोकणच्या नवोदित कलाकारांनी ‘अर्धवट’ही एकांकिका सादर केली. तर मालवणी भाषेवर प्रभुत्व असलेला, अभिनय क्षेत्रातील उगवता तारा, ऋत्विक धुरी याने गाबित समाजाची मानसिकता, सामाजिक बांधिलकी, रूढी-परंपरा, वैविध्यपूर्ण मासेमारी यावर नर्म विनोदाने प्रेक्षकांशी संवाद साधला. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या वीणा शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळातील कार्यकर्त्या हर्षा चौगुले, वैशाली सरवणकर, शितल मुणगेकर, नम्रता भाबल, कांचन मणचेकर, मृणाल बापर्डेकर, मानसी तांडेल, वंदना खवळे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन सादरीकरण केले. संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश बटा, खजिनदार शैलेश राऊळ, कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र वस्त, चंद्रहास केळुस्कर, सदस्य मनोहर केळुसकर, अजयकुमार चोपडेकर, दीपक धुरी, फोटोग्राफर बाळ पराडकर, डेकोरेटर प्रदीप चव्हाण, श्रीविद्या सरवणकर आणि रवींद्र भाबल यांनी कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार त्याबरोबरच या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रायोजकाची भूमिका पार पाडली.