नवी दिल्ली : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ६४ स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिल याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सुमितने उत्कृष्ट सातत्य आणि कामगिरीच्या जोरावर पॅरालिम्पिक स्पर्धेतही त्याने ७०.५९ मीटर लांब भाला फेकत नवा विक्रम केला आहे. त्याच्या या सुवर्णयशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भविष्यातील कामगिरीसाठी सुमितला शुभेच्छा दिल्या आहेत.
या सुवर्णयशाबाबत सुमित म्हणाला, 'मी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो. सामन्याआधी मला वेदनाशामक औषध घ्यावे लागले. मला पाठीवर उपचार करावयाचे असल्याने दुखापत मोठी होऊ नये म्हणून मी खूप काळजीपूर्वक खेळलो, असेही सुमितने सांगितले. सुमितच्या आतापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकल्यास एक दशकाहून अधिक काळ पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या सुमितने फिजिओच्या सल्ल्याने गोड पदार्थ खाणे सोडून दिले. त्याने कठोर आहार संतुलनावर भर दिला. दोन महिन्यांत त्याने १२ किलो वजन कमी केले. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणजे पॅरालिम्पिक विजेतेपद राखणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारताकरिता पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी (एसएल३) स्पर्धेत नितेश कुमार तर अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग (एसएच१) क्रीडाप्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच, पुरुषांच्या थाळी फेक एफ५६ स्पर्धेत क्रीडापटू योगेश कथुनियाने रौप्य पदक जिंकले आहे. आतापर्यंत पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारत ३ सुवर्ण, ०५ रौप्य तर ०७ कांस्य अशा एकूण १५ पदकसंख्येसह तालिकेत १५व्या स्थानी आहे.