कोल्हापूर : भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली.
याप्रसंगी बोलताना समरजित घाटगे म्हणाले की, "येत्या काळात कागलमध्ये परिवर्तन घडवण्याची आज मुहूर्तमेढ झाली आहे. आपण हा निर्णय कागलच्या भविष्यासाठी घेतला आहे. कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. यापुढे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला दहा हत्तींचं बळ मिळालं आहे. पुढचे दोन महिने लोकांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत शरद पवार साहेबांचा संदेश पोहोचवायचा आहे. तसेच कागल विधानसभेत सुराज्य निर्माण करायचं आहे," असे ते म्हणाले.