मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर विदर्भातीलही अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. बुलढाण्यात पैनगंगा नदीला पूर आला असून जालन्यातील धामणा धरण १०० टक्के भरले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हे वाचलंत का? - "मविआचं दंगली घडवण्याचं कट-कारस्थान तर नाही ना?"
गेल्या २४ तासांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ९३ पैकी २६ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. इथल्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. तसेच पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.