महापालिकेच्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२४’चे प्रकाशन!
श्रीगणेशोत्सवाबाबत विविधस्तरीय माहिती देणारी उपयुक्त पुस्तिका
03-Sep-2024
Total Views |
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या व महानगरपालिका (Municipal corporation) मुद्रणालयाद्वारे मुद्रित करण्यात आलेल्या ‘श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२४’चे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते दि. २ सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण माहिती, श्री गणेश गौरव स्पर्धेच्या अर्जाचा नमुना, विविध मार्गदर्शक सूचना, कृत्रिम तलावांची यादी, धोकादायक पुलांची यादी तसेच महानगरपालिकेचे व इतर महत्त्वाच्या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) (अतिरिक्त कार्यभार) शरद उघडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते.
तरी या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर असलेला 'क्यूआर कोड' स्कॅन करून ही पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.