गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अन्यथा कडोंमपा प्रशासनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवू - आमदार विश्वनाथ भोईर

प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमीपूजन

    03-Sep-2024
Total Views |

vishwanath bhior
 
 
 
 
कल्याण  : रस्त्यांवरील खड्डे भरण्यात कडोंमपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे कडोंमपा आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये मंजूर निधीतून मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत कडोंमपा प्रशासनाला धारेवर धरले.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र अद्यापही कडोंमपा प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही. काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती तेव्हाच कडोंमपाने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते. परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी कडोंमपाचे कोणतेही नियोजन नाही की कुठलीही तयारी नाही असे आमदार भोईर यांनी सांगितले. तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे कडोंमपा आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कडोंमपा प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशाराही भोईर यांनी कडोंमपा प्रशासनाला दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांचा विकासनिधी...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही विकासकामे सुरू करता येत नव्हती. त्याच अनुषंगाने सोमवारी गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर कल्याण पश्चिमेतील उर्वरित मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी यावेळी दिली.
या भूमीपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उप शहर प्रमूख सुनिल खारुक, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी - कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.