“लालबागच्या राजाची दागिन्यांनी सजलेली नयनरम्य मूर्ती भाविकांना लवकरच पाहायला मिळणार”, सुवर्णकार ‘संजय वेदक’ यांची माहिती
03-Sep-2024
Total Views |
मुंबई, दि. २: प्रतिनिधी : मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजाचे’ दागिने दरवर्षी सोनार संजय वेदक उर्फ नाना वेदक तयार करतात. या वर्षीही लालबागच्या राजाची दागिन्यांनी सजलेली नयनरम्य मूर्ती भाविकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, अशी माहिती सोनार वेदक यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. यावर्षी लालबागच्या राजासोबतच मुंबईतील ३० मोठ्या मंडळांतील गणपतींसाठी त्यांनी दागिने तयार केले असल्याचेही कळवले.
२००६ साली लालबागच्या राजाचे मूर्तिकार ‘रत्नाकर कांबळी’ यांच्या ओळखीने ‘नाना सोनार’ यांना लालबागच्या राजाची ‘सोन्याची पाऊले’ तयार करण्याचे काम मिळाले होते. हे काम मिळण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीच्या दागिन्यांचे काम केले होते. त्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील उत्कृष्ट सुवर्णकाम पाहून त्यांना २००६ मध्ये लालबागच्या राजाची ‘सुवर्ण पाऊले’ बनवण्याचे काम मिळाले आणि तेव्हापासून लालबागच्या राजाचे सर्व दागिने सोनार संजय वेदकच तयार करतात. ‘लालबागच्या राजाचे सुवर्णकार’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. राजाचा सुवर्ण आशीर्वाद हात आणि सुवर्ण पाऊलांपासून, बाजूबंद, कंठी, तोडे, भिकबाळी, सोंडपट्टी, कमरपट्टा असे सर्वच दागिने सुवर्णकार संजय वेदक तयार करतात. नवीन दागिने तयार करण्याचे, जुने दागिने दुरुस्त करण्याचे आणि ते पॉलिश करण्याचे काम दरवर्षी ‘नाना सोनार’ करतात.