इस्रायलचा ‘पेजर हल्ला’ आणि ‘हिजबुल्ला’ची हार

    29-Sep-2024
Total Views |
 
Pager attak
 
इस्रायलच्या कालच्या ताज्या हल्ल्यात ‘हिजबुल्ला’चा म्होरक्या नसराल्लाह ठार झाला असून, त्यापूर्वी लेबेनॉन पेजर हल्ल्यांनी हादरुन गेले होते. त्यानिमित्ताने इस्रायलच्या या युद्धनीतीचे विश्लेषण करणारा हा लेख...
 
'पेजर हल्ल्या’ला प्रत्युत्तर म्हणून ‘हिजबुल्ला’ ही लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ला करणार होती. मात्र, त्याआधी १९ सप्टेंबरला इस्रायलने लेबेनॉनमध्ये हवाई हल्ले केले. यावेळी ‘हिजबुल्ला’ची एक हजार रॉकेट्स भुईसपाट केली गेली.
रॉकेटच्या माध्यमातून ‘हिजबुल्ला’ला इस्रायलवर निशाणा साधायचा होता. ‘हिजबुल्ला’ ‘हमास’ला पाठिंबा देणारी दहशतवादी संघटना आहे. ‘हमास’ला पाठिंबा देत ‘हिजबुल्ला’ लेबेनॉनमधून इस्रायलवर रॉकेट डागण्याचे काम करत आहे.
 
‘हिजबुल्ला’च्या ८७९ सदस्यांचा मृत्यू
 
लेबेनॉन येथे पेजर स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटात ‘हिजबुल्ला’च्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत, ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून, यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत. हल्ल्यात दळणवळण संसाधनांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. पेजर स्फोटात सुमारे नऊ मारले गेले, तर तीन हजार जखमी झाले आहेत.
 
प्रत्येक पेजरमध्ये तीन ग्रॅम विस्फोटक
 
प्रत्येक पेजरमध्ये तीन ग्रॅम विस्फोटक असल्याचा दावा ‘हिजबुल्ला’ने केला आहे. पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबेनॉन आणि शेजारी देशांपैकी, सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. हा स्फोट आहे की घातपात?
 
जखमींपैकी अनेक ‘हिजबुल्ला’शी संबंधित होते. हा स्फोट पेजर अधिक गरम झाल्याने झाला. पेजर ठेवणार्‍या ‘हिजबुल्ला’मुळे इतर आजूबाजूच्या लोकांना याचा फटका बसला. ‘हिजबुल्ला’ने म्हटले की, “इस्रायलने हजारो पेजर्समधील सिग्नल हॅक केले. इतक्या वारंवारतेने मेसेज पाठवले की, ज्यामुळे असंख्य बॅटरी गरम झाल्याने स्फोट झाला.”
 
‘हिजबुल्ला’कडून पेजरची निवड का?
 
‘हिजबुल्ला’च्या दृष्टीने विचार करता, पेजर हे सुरक्षेच्या दृष्टीने इतर कोणत्याही संपर्कासाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा अधिक सुरक्षित होते. पेजरच्या वापरामुळे अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन ट्रेसिंग’ यंत्रणांना या दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे कठीण झाले, म्हणून ‘हिजबुल्ला’कडून पेजरची निवड.
 
मोबाईल संपर्क केल्याने शत्रू आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती काढून घेतात. अनेकदा मोबाईल हॅक होण्याच्या घटना घडतात. मात्र, पेजर वापरले गेले, तर हे उपकरण वापरण्यास सोपे असून, हॅक करणे सोपे नाही, म्हणून पेजरचा वापर केला जात होता.
 
इस्रायलच्या दृष्टीने विचार केला, तर पेजर हे एकाच वेळी मोठ्या संख्येने ‘हिजबुल्ला’च्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे एक प्रभावी माध्यम ठरले. कारण, हे पेजर वैयक्तिक वापरासाठी असल्यामुळे त्या-त्या व्यक्तीलाच लक्ष्य करणे सोपे होते. यामुळे लेबेनॉनमधील ‘हिजबुल्ला’च्या नेटवर्कलाच एक मोठे भगदाड पाडण्याची आणि त्यातून कमकुवत करण्याची संधी ‘मोसाद’ला उपलब्ध झाली. ‘हिजबुल्ला’कडून पेजर खरेदी केले जाणार असल्याचा सुगावा ‘मोसाद’ला आधीच लागल्यामुळे त्यांना पेजरमध्ये स्फोटके आधीच फिट करणे शक्य झाले. त्यांनी पेजर बनवणार्‍या कंपनीशी संगनमत करून या पेजरमध्ये विशिष्ट स्फोटकांची क्षमता असणार्‍या मिनी चिप बसवल्या. या रिमोट ट्रिगर प्रणालीने सज्ज होत्या.
 
पेजर्सचा पुरवठा करताना ‘हिजबुल्ला’ने तैवानमधून पाच हजार पेजर्स मागवले होते. ते वर्षाच्या सुरूवातीला ‘हिजबुल्ला’पर्यंत पोहोचले होते. पेजरमध्ये स्फोटके भरण्यात आली. पेजरचे वाटप ‘हिजबुल्ला’मध्ये करण्यात आले होते. यावेळी इस्रायलने योग्य संधी पाहून धमाका केला. लिथियम हे बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट होत नाही म्हणून, लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही, पद्धतशीरपणे ज्याप्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार होता.
 
इस्रायल, लेबेनॉनचे एकमेकांवर हल्ले
 
इस्रायलच्या सैन्यदलाने शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात ‘हिजबुल्ला’चा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाला. अकीलने ‘हिजबुल्ला’च्या ‘एलिट रडवान फोर्स’ आणि ‘जिहाद कौन्सिल’ या लष्करी गटांचा प्रमुख म्हणून काम केले आहे. बैरूतमधील अमेरिकी दूतावासावर १९८३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात अकिलचा हात होता.
 
इस्रायल आणि लेबेनॉन या देशांनी शुक्रवारी एकमेकांवर हल्ले केले. ‘हिजबुल्ला’ने उत्तर इस्रायलावर तीन हल्ले केले असून, त्यात १४० क्षेपणास्त्रे डागली. त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान आठ जण ठार झाले, तर ६० जण जखमी झाले. या हल्ल्यांत बैरुतमध्ये अनेक इमारती, वाहनांचे नुकसान झाले. ‘हिजबुल्ला’ने इस्रायलच्या उत्तर भागांत क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यापैकी बहुतेक मोकळ्या भागात पडली.
 
लेबेनॉनमध्ये दि. १७ सप्टेंबर रोजी एकाच वेळी जवळपास २ हजार, ८०० पेजरमध्ये छुप्या अप्रत्यक्ष हल्ल्यामध्ये इस्रायलने २ हजार, ८०० ‘हिजबुल्ला’ सदस्यांना एकाच वेळी लक्ष्य केले.
 
वॉकीटॉकींचा स्फोट
 
दि. १८ सप्टेंबर दक्षिण लेबेनॉन आणि उपनगरात ‘हिजबुल्ला’ने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, ते वॉकीटॉकी जपानच्या आयकॉम कंपनीचे आहेत.
 
ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, त्या मॉडेलची निर्मिती कंपनीने दशकभरापूर्वीच बंद केली होती, असे कंपनीने स्पष्ट केलं आहे. तरीही, आम्ही यासंदर्भात तपास करत आहोत, असे कंपनीने म्हटलं आहे.
 
सायबर युद्धांमध्ये इस्रायलचा मोर्चा सांभाळणारी गुप्तचर यंत्रणा
 
सायबर युद्धांमध्ये इस्रायलचा मोर्चा सांभाळणारी गुप्तचर यंत्रणा ‘युनिट-८२००’ने ‘हिजबुल्ला’वर हल्ले सुरू केले आहेत. ‘युनिट-८२००’ ही सायबर संस्था पेजर्स व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटके बसवणे, रिमोट-कंट्रोलद्वारे त्यांचे नियंत्रण मिळवणे व एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवून आणणे या तिन्ही गोष्टींवर ‘युनिट-८२००’ ने अनेक महिने काम केलं होतं. ‘युनिट ८२००’ मधील सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले गुणी कर्मचारी आहेत. इस्रायलची संरक्षण क्षमता, सायबर सुरक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
 
‘युनिट ८२००’ व या संस्थेतील कर्मचारी शत्रूराष्ट्रांची माहिती गोळा करणे, ती माहिती गुप्तचर यंत्रणा व संरक्षण यंत्रणांना पुरवणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे, सायबर सुरक्षा पुरवणे यांसारखी कामे करतात. या युनिटची थेट ‘युएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’शी तुलना केली जाते. इस्रायली सरकार ’युनिट-८२००‘च्या कारवाया व मोहिमांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर पडू देत नाही.
 
पेजरचाच पर्याय का निवडला?
 
इस्रायलकडे संहारक अस्त्र असूनही त्यांनी पेजरचाच पर्याय का निवडला? इस्रायल मोठ्या प्रमाणात ‘हमास’, ‘हिजबुल्ला’च्या दहशतवाद्यां विरुद्ध हवाई हल्ले करत आहे. याचा मुख्य उद्देश आहे की, त्यांच्या महत्त्वाच्या नेतृत्वाला ठार करावे. यामुळे या संघटनांची शक्ती कमी होईल. आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा.कारण, ज्या वेळेला निर्दोष नागरिक मारले जातात, त्यामुळे त्या समाजामध्ये इस्रायलच्या विरुद्ध अजून रागाची भावना निर्माण होते.
 
नेतृत्व मारणे इतके सोपे नाही. कारण, नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असते. ज्यावेळेला इस्रायलला माहिती मिळते की, नेतृत्व या घरांमध्ये लपले आहे, त्यावेळी हवाई हल्ले केले जातात. परंतु, अनेक वेळा मिळालेली गुप्तहेर माहिती चुकीचीही ठरलेली दिसते.
 
याउलट, पेजर हल्ल्यामध्ये इस्रायलने २० मिनिटांच्या आत जुनाट तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण युद्ध पद्धतीचा वापर करून ४० ते ५० टक्के ‘हिजबुल्ला’ नेतृत्वाचा खात्मा केला आहे, जे एक मोठे यश म्हणावे लागेल. म्हणजेच, जे हवाई दलाच्या हल्ल्यातून शक्य होत नव्हते, ते केवळ नाविन्यपूर्ण युद्ध कल्पना वापरून इस्रायलने केले.
 
‘युनिट-८२००’ सारखी संस्था आपण भारताच्या सायबर कमांडमध्ये निर्माण करु शकतो का?
 
भारतामध्ये अजून सुद्धा ३० ते ४० टक्के मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही चीनमधून आयात केली जातात. त्यांचा शस्त्र म्हणून वापर भारताच्या विरोधात केला जाऊ शकतो का?
 
वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या युद्धामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून भारताने सुद्धा अशा युद्ध पद्धतीचा विचार करावा आणि अशा नाविन्यपूर्ण संकल्पना पाकिस्तान, चीन, दहशतवादी, नक्षलवाद्यांच्या विरोधात कशा वापरता येतील, यावरती संशोधन करावे, ज्यामुळे देश जास्त सुरक्षित होईल.
                                                                                                                                        लेखक - (नि.) ब्रि. हेमंत महाजन