कुठलीच चांगली साहित्यकृती कधीही भाषेच्या बंधनात अडकून राहत नाही. एखाद्या भाषेत जरी ती निर्माण झाली असली, तरी त्या भाषेचा बंध तोडून, ती अन्य भाषिकांपर्यंत पोहोचतेच. भाषेला हा बंध तोडायला आणि इतर भाषिकांपर्यंत पोहोचायला मदत करते ते ‘भाषांतर.’ उद्याच्या ‘जागतिक भाषांतर दिना’च्या निमित्ताने ‘भाषांतरक्षेत्राची गरज आणि व्यापकता’ या विषयाचा घेतलेला संक्षिप्त आढावा.
‘भाषा’ आणि ‘अंतर’ या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजे ‘भाषांतर.’ त्यामुळे ‘भाषांमधील अंतर दूर करते ते भाषांतर’ अशी त्याची व्याख्या केली, तरी ती वावगी ठरणार नाही. पहिले भाषांतर कधी आणि कोणत्या साहित्यकृतीचे केले गेले, याविषयी काही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण, लेखन आणि भाषांतर यांचे नाते अनेक शतकांपासूनचे आहे, यात मात्र काहीही शंका नाही. लेखन हे बिंब आहे, तर भाषांतर त्याचे प्रतिबिंब म्हणता येईल. १९-२०व्या शतकात जागतिकीकरणाला सुरुवात झाल्यापासून, जगभरात भाषिक देवाणघेवाणसुद्धा वाढली आणि त्यातून भाषांतराला चालना मिळाली. धार्मिक, सामाजिक, राजकीय असे सर्व प्रकारचे साहित्य एका भाषेतून दुसर्या भाषेत भाषांतरित होऊ लागले आणि साहित्याचे एक ‘वैश्विक दालन’ तयार झाले. २१व्या शतकात तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या भाषांतराच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. पण, अजूनही भाषांतराच्या बाबतीत एक प्रश्न कायम विचारला जातो, तो म्हणजे ‘भाषांतर ही कला आहे की शास्त्र?’ काहींच्या मते, भाषांतर करताना आधी अस्तित्वात असलेल्या साहित्यकृतीची फक्त भाषाच बदलली जाते. त्यात लिहिणार्याची सर्जनशीलता पणाला लागत नाही. त्यामुळे, भाषांतर हे फक्त एक शास्त्र आहे कला नाही, तर, भाषांतर हे सगळ्यांनाच जमत नाही, मूळ आशयाला धक्का न लावता आणि असंबद्धता निर्माण न करता ते करावे लागते. त्यामुळे भाषांतर ही कलाच आहे, असा म्हणणारा दुसरा गटही आहे. याविषयी प्रसिद्ध आणि अनुभवी भाषांतरकार सुनीता लोहोकरे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विचारले असता, त्या म्हणाल्या की, “भाषांतर हे कामावर आणि क्षेत्रावर अवलंबून असते. एखाद्या तांत्रिक क्षेत्रात भाषांतर करताना तो तांत्रिकदृष्ट्या करावा लागतो. पण, वैचारिक किंवा ललित साहित्यात असे करून चालत नाही. तिथे भावनांना अधिक महत्त्व असते. ज्या क्षेत्रासाठी भाषांतर करायचे आहे, त्या क्षेत्राची गरज लक्षात घेऊन तो करावा लागतो. त्यासाठी भाषांतरकाराची शब्दांवर हुकूमत असावी लागते, भाषांवर प्रभुत्व असावे लागते आणि त्याच्याकडे सर्जनशीलताही लागते. म्हणून भाषांतर हे भाषांतर कला आणि शास्त्र या दोन्हींचा मिलाप आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाषांतर या क्षेत्रात भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर या संज्ञा कधी विविध अर्थाने आणि कधी समानार्थाने वापरल्या जातात. शब्दश: भाषांतर आणि अर्थश: भाषांतर किंवा शब्दानुवाद आणि भावानुवाद हा भाषांतर किंवा अनुवाद क्षेत्रातील मुख्य भेद मानला जातो. भाषांतर कला आणि शास्त्र मानणारे असे ज्याप्रमाणे दोन गट आहेत, त्याचप्रमाणे शब्दश: भाषांतर किंवा शब्दानुवादाला शास्त्र आणि अर्थश: भाषांतर किंवा भावानुवादाला कला मानणारा तिसरा गटही आहे. याविषयी प्रसिद्ध लेखक श्री. म. माटे यांनी केलेले विधान खूप महत्त्वपूर्ण ठरते. माटे यांनी म्हटले आहे, ”एका कुपीतील अत्तर दुसर्या कुपीत आले आहे की नाही, एवढेच भाषांतराच्या कामी पाहावे. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची आणि आकाराची असली पाहिजे, असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही.” विविध क्षेत्रांत या भाषांतराशी संबंधित संज्ञांचा अर्थ जरी वेगळा असला, तरी सगळ्या क्षेत्रात भाषांतराची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची स्थिती मात्र सारखीच आहे. जग ही एक मोठी बाजारपेठ झाली आहे आणि या बाजारपेठेतले व्यवहार विविध भाषांमध्ये होतात. त्यामुळे जगाच्या प्रत्येक कोपर्यातील प्रत्येक क्षेत्र भाषांतराने हल्ली व्यापलेले आहे. तंत्रज्ञानातील दररोज होणार्या प्रगतीमुळे भाषांतर क्षेत्रात सुद्धा रोज नवनवे बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता ‘भाषांतर’ क्षेत्राला आणि मुख्यत: भाषांतरकारांच्या अस्तित्वाला तारक ठरणार की मारक, याची चर्चा अनेक स्तरांवर सध्या होत आहे. याविषयी तंत्रज्ञान आणि भाषांतर या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असणारे भाषांतरकार ओंकार पळधे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला असता, ते म्हणाले की, “पूर्वी जे काम भाषांतरकार करायचे, ते आता अनेक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता करत आहे. त्यामुळे भाषांतरकारांची नोकरी धोक्यात येत आहे. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक कंपन्यांना जागतिक स्तरावरील लोकांशी, संस्थांशी संवाद साधण्यास मोठी मदत होत आहे, हे ही तितकेच खरे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिक क्षेत्रात भाषांतर करू शकते. कारण, तिथे आशयापेक्षा संकल्पना समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, साहित्य, न्याय अशा क्षेत्रांमध्ये जिथे अर्थाला खूप महत्त्व असतो, त्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी भाषांतर अजून तरी करू शकत नाही.” असे मत त्यांनी मांडले.
कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रभावी होत गेली तरी, ज्या मानवाने तिला तयार केले आहे, त्याच्या बौद्धिक कौशल्यांशी आणि भावनिकतेशी ती स्पर्धा करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकते. पण, त्यातील मर्म समजायला मानवी मनच लागते. त्यामुळे भाषांतर या क्षेत्रात भाषांतरकारांची जागा ती घेऊ शकत नाही. हे क्षेत्र व्यापक असल्याने सगळ्याच गोष्टींचा आढावा एका लेखात घेणे शक्य नाही. पण, तरीही जागतिक भाषांतर दिनाच्या निमित्ताने या विषयाचा धावता आढावा घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न!