मुंबई : केंद्राच्या इंटेलिजन्स ब्युरो कडून मुंबईला हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना घातपाताच्या प्रयत्नात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात बंदोबस्त वाढवला आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मीक स्थळांवर पोलिसांना मॉक ड्रिल करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्व पोलिस उपायुक्तांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सक्रियपणे लक्ष ठेवण्याचे आवाहान सुद्धा करण्यात आलं आहे.
शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त होती. सणसमारंभ आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सिक्युरीटी ड्रील घेण्यात आल्याची माहिती मिळते. चेंबुर मध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंदीराच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. सिद्धीविनायक मंदीराचे विश्वस्त सदा सरवणकर माध्यमांशी बोलताना म्हणाले " आम्हाला मुंबई पोलिसांनी मंदिराची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. सर्व सुरक्षा व्यवस्थेकडे आम्ही लक्ष पुरवत आहोत." खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मंदिरांना सतर्क राहण्याचा आणि कुठलीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. दहा दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाल्यानंतर, मुंबईकरांना दुर्गापूजा, दसरा, आणि दिवाळीचे वेध लागले आहेत.