गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची तोडफोड

महिला मानसिक आजारांनी त्रस्त; सोसायटीमधील रहिवाशांनाही त्रास

    28-Sep-2024
Total Views |

mantralaya
 
मुंबई, दि. २७ : (Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली. घोषणाबाजी करत तिने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला त्यांचा नाम फलकसुद्धा उखडून फेकला. ही महिला मंत्रालयात विनापास घुसल्याचे समोर आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
 
दरम्यान, गुरुवार, दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका महिलेने मंत्रालयाचा पास न काढताच गेटमधून आता प्रवेश केला. ही महिला सचिव गेटमधून विनापास मंत्रालयात शिरली. पुढे ती थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचली. तिने घोषणाबाजी करत कार्यालयात तोडफोड केली. नासधूस केली. तिने फडणवीस यांच्या नावाचा नामफलक काढून फेकला. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हल्ल्यामुळे या तोडफोड करणार्‍या महिलेची ओळख पटली.
 
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षेसाठी केवळ पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे या महिलेला रोखता आले नव्हते. ही महिला मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले. तसेच, ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथल्या चेअरमननीही सदर महिला उच्चशिक्षित असून, मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने मागच्या दहा महिन्यांपासून सोसायटीमधील लोकांना त्रास देत असल्याचे सांगितले.
 
विरोधक मनोरुग्णांसारखे वागत आहेत का?
 
आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयावर धिंगाणा घालणार्‍या महिलेची ओळख आता पटली आहे. ती बिचारी कुठल्यातरी मानसिक त्रासाने ग्रस्त आहे. तिचे जे व्हायचे ते होईल. पण, मला आता विरोधकांची कीव करावीशी वाटते. कुठलीही माहिती न घेता सकाळ झाली की बोंबा मारणार्‍यांनी आतातरी विचार केला पाहिजे. विरोधक मनोरुग्णांसारखे वागत आहेत का, याचे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
 
- चित्रा वाघ, भाजप, महिला प्रदेशाध्यक्ष
 
  
तिची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू
 
त्या महिलेचं काय म्हणणं होतं? तिने ते कशासाठी केलं? हे आम्ही समजून घेऊ. तिने ते उद्विग्नतेने केलं का, तिची काही व्यथा आहे का, हे सगळं समजून घेऊन तिची व्यथा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. विरोधक खूप निराश आणि हताश आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. माझ्याकडे त्यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पण, कुणी खालच्या स्तरावर उतरल्यामुळे आपण उतरायचं नसतं. एखादी बहीण चिडली असेल, तर ते आपण समजून घेऊ. कुणी तिला जाणीवपूर्वक पाठवलं असेल, तर तेदेखील समजून घेऊ. आपल्या मंत्रालयात आपण सर्वांना प्रवेश देतो. कुठलीही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकं कधी पहिल्या मजल्यावरून जाळीवर उडी मारतात, तर कधी रोष व्यक्त करतात. याचा अर्थ ते आपले विरोधक आहेत, असा होत नाही. त्यांच्या काही अडचणी असतात आणि त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो.
 
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री