आधार, पॅनची माहिती उघड करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई

    28-Sep-2024
Total Views |
 
aadhaar
 
नवी दिल्ली, दि. २७ : केंद्र सरकारने भारतीय नागरिकांच्या आधार (Aadhaar) आणि पॅन कार्ड तपशीलांसह संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करणारी काही संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत.
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाला संकेतस्थळांमध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, काही संकेतस्थळे भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती उघड करत असल्याचे दिसून आले होते. सुरक्षित सायबर सुरक्षा पद्धती आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने याची गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. या अनुषंगाने, ही संकेतस्थळे ब्लॉक करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
 
याविषयी ‘आधार’तर्फे आधार (आर्थिक आणि इतर अनुदानांचे लक्ष्यित वितरण, लाभ आणि सेवा) कायदा, २०१६ अंतर्गत प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे संबंधित संकेतस्थळ मालकांना आयसीटी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि असुरक्षा दूर करण्यासाठी करावयाच्या कृतींबद्दल मार्गदर्शन केले गेले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.