मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे विशेष चर्चेत असतात. त्यांनी आत्तापर्यंत ‘काश्मीर फाईल्स’, ‘वॅक्सिन वॉर’ आणि ‘ताश्कंद फाईल्स’चे दिग्दर्शन केले आहे. तसेच, आपल्या स्वतःच्या चित्रपटांवर कोणी टीका केल्यास आपली बाजू मांडताना देखील ते दिसतात. सध्या, चित्रपटसृष्टीत बड्या कलाकारांच्या मॅनेजरचा विषय फार गंभीर आहे. आणि यावरच आपलं मत मांडत त्यांनी नुकतंच त्यांच्या आगामी चित्रपटातून एका बड्या अभिनेत्याला काढून टाकलं आहे, असं एक्सवर सांगितलं आहे.
तर झालं असं की, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एक्सवरवर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी चित्रपटसृष्टीतील कास्टिंग डायरेक्टर आणि त्यांचे मॅनेजर्स यांच्यावर टीका केली होती. मुकेश छाब्रा यांच्या याच पोस्टवर विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त होत त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमातून एका मोठ्या अभिनेत्याची हकालपट्टी केल्याचं म्हटलं.
मुकेश छाब्रा यांनी पोस्टमध्ये म्हणतात की, सध्या आपल्या सिनेसृष्टीत एक अभिनेता २०० कास्टिंग डायरेक्टर्स आणि १५,६८० मॅनेजर्स झाले आहेत अशी स्थिती आहे. म्हणजे अभिनेत्यांची संख्या कमी आणि कास्टिंग डायरेक्टर आणि मॅनेजर्सची संख्या प्रचंड वाढली आहे.
मुकेश यांच्या या पोस्टवर व्यक्त होत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मला गेल्या आठवड्यात एका मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकावं लागलं, कारण त्याचा मॅनेजर खूप उद्धट वागत होता. तो एका मोठ्या सेलिब्रिटीच्या स्टार किडच्या टॅलेंट एजन्सीचा कर्मचारी असल्यामुळे त्याला असं वागण्याचा विशेष अधिकार आहे असं त्याला वाटत होतं. या अनेक मॅनेजर्सनी मुलांचे करिअर घडवायचे सोडून ते उद्ध्वस्त केले आहेत. मुकेश, कृपया या सर्व जणांचं वर्कशॉप घेऊन यांना सर्व गोष्टी पुन्हा शिकव”.
दरम्यान, कोणत्या कलाकाराला काढून टाकलं ते नाव अग्निहोत्रींनी जाहिर केलं नाही आहे. दरम्यान, नुकतंच ‘अनस्क्रिप्टेड’ या पॉडकास्टवर बोलताना विवेक म्हणाले, “हे मी गर्वाने सांगत नाही, पण सत्य सांगतो आहे. मला असं वाटायला लागलं की मी ज्या स्टार्सबरोबर काम करतो, ते शिक्षित नाहीत आणि त्यांना जगाचं काहीच ज्ञान नाही. मी त्यांच्यापेक्षा खूपच हुशार आहे आणि माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. हे लोकं इतके मूर्ख आहेत की ते तुमचंही काम खराब करतात.” पुढे ते म्हणाले होते की, “बॉलीवूडचे चित्रपट मूर्ख असतात, कारण त्यांचे स्टार्स मूर्ख असतात. हे स्टार्स इतके मूर्ख असतात की ते प्रत्येक दिग्दर्शक आणि लेखकाला मूर्ख बनवतात.”