पोलिसांविरोधात याचिका करणारे असीम सरोदे ‘उबाठा’चे निकटवर्तीय

मनीषा कायंदे यांचा आरोप; विशिष्ट राजकीय पक्षांसाठी त्यांचे ‘सिलेक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हीझम’

    28-Sep-2024
Total Views |
 
asim sarode
 
मुंबई, दि. २७ : (Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्‍या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
 
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत कायंदे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, “सरोदे पेशाने वकील आहेत. त्यांना याचिका दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, त्यांनी पोलिसांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आमचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे वकील असीम सरोदे एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहेत का?” अशी शंका कायंदे यांनी व्यक्त केली.
 
“मागील काही महिन्यांचा घटनाक्रम बघितला, तर असीम सरोदे ठराविक राजकीय पक्षांना फायदा होईल, अशीच भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरेंशी सरोदे यांची भेट, ठाकरे कुटुंब आणि असीम सरोदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर आहेत. हेच वकील असीम सरोदे हे काही महिन्यांपूर्वी उबाठाच्या मंचावर बोलताना दिसले होते. सरोदे आणि ठाकरे यांच्या भेटीगाठींवरुन सरोदे उबाठाच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात का?” असा खरमरित सवाल कायंदे यांनी विचारला.
 
बॉडीबॅग घोटाळ्यात का याचिका दाखल केली नाही?
 
“कोविड काळात मुंबईत कोविड सेंटर घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा, खिचडी घोटाळा असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले, त्याबाबत सरोदे न्यायालयात का गेले नाहीत? महाविकास आघाडीच्या काळात मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती, त्याविषयी सरोदेंनी न्यायालयात धाव का घेतली नाही? लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘निर्भय बनो आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सरोदे यांनी आरोपांची राळ उठवली होती. माननीय राज्यपाल यांच्या विरोधात’ही सरोदे यांनी जाहीर अपशब्द काढले होते. संसदेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणार्‍या आरोपीचे वकीलपत्र सरोदे यांनी घेतले,” असा हल्लाबोल मनिषा कायंदे यांनी केला.