संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानला फटकारले!

जम्मू-काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करणे पडले महागात

    28-Sep-2024
Total Views |

Ind-Pak UNGA

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (India Pakistan)
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र महासभेत पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जम्मू-काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली आहे. यावर भारतानेही पाकिस्तानला खडेबोल सुनावल्याचे दिसले. "दहशतवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर चालणारा देश आता ज्ञान देऊ लागलाय.", असे म्हणत भारतीय मुत्सद्दी भाविका मंगलानंदन यांनी शाहबाज शरीफ यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शेहबाज शरीफ म्हणाले की, पॅलेस्टाईनच्या लोकांप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या लोकांनीही त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतके संघर्ष केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी भारताने केलेल्या वचनबद्धतेपासून दूर असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी भारतावर न्यायबाह्य हत्येचा, परिसरात कर्फ्यू लादणे आणि इतर कठोर कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलंत का? : लव्ह जिहादचा डाव उधळला; डेहराडून रेल्वे स्थानकात तुफान राडा

पुढे ते म्हणाले, "भारत काश्मिरींच्या जमिनी आणि मालमत्ता जप्त करत आहे आणि मुस्लिम बहुसंख्य लोकांना अल्पसंख्याक बनविण्याच्या कटाचा एक भाग म्हणून बाहेरच्या लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये वसवत आहे. त्यांनी इस्लामोफोबियावरील चर्चेवेळी भारतातील 'हिंदू वर्चस्ववादी अजेंडा' या मुद्द्याचे 'सर्वात भयंकर प्रकटीकरण' असे वर्णन केले. भारतीय मुस्लिमांना वश करणे आणि 'भारताचा इस्लामिक वारसा नष्ट करणे' हे भारताचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

शेहबाज शरीफ यांना उत्तर देताना, संयुक्त राष्ट्र महासभेतील भारतीय मुत्सद्दी भाविका मंगलानंदन म्हणाल्या, "दुर्दैवाने आज या महासभेत एक हास्यास्पद घटना घडली. दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेल्या लष्कराने चालवलेल्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. जगाला माहित आहे की, पाकिस्तानने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध सीमापार दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. आपल्या संसदेवर, आपली आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजारपेठांवर आणि तीर्थक्षेत्रांवर हल्ला केला आहे. ही यादी मोठी आहे. अशा देशासाठी कुठेही हिंसाचाराबद्दल बोलणे हा सर्वात मोठा दांभिकपणा आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, "सत्य हे आहे की पाकिस्तान आपल्या प्रदेशावर डोळा ठेवून आहे आणि भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांमध्ये अडथळा आणण्यासाठी सातत्याने दहशतवादाचा वापर करत आहे. दहशतवादाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की भारताविरुद्ध सीमापार दहशतवादाचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. पाकिस्तान काय आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. या देशाच्या बोटांचे ठसे जगभरातील अनेक दहशतवादी घटनांवर आहेत.”