जयंत पाटलांसमोर कार्यकर्त्यांनी दिल्या ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणा
27-Sep-2024
Total Views |
मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणा दिल्यामुळे गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ते चांगलेच भडकले. त्यांनी नाराजी व्यक्त करत सभेतून काढता पाय घेतला.
शरद पवार गटाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे. गुरुवारी, ही यात्रा अहमदनगरमधील आकोले येथे आली असता, मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. ते भाषणाला उभे राहिले असता, काही उत्साही कार्यकर्तांनी ‘अजितदादा जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. घोषणा ऐकताच जयंत पाटील चांगलेच संतापले. " घोषणा देणारा कोण आहे? त्याने हात वर करा, अन्यथा मी याठिकाणी भाषण करणार नाही" असे सांगत त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला. मात्र, स्थानिक नेत्यांनी त्यांची समजूत काढत थांबण्याची विनंती केल्यावर त्यांनी नाराजीच्या स्वरात थोडक्यात भाषण आटोपले.