"सकाळी उठून खोटे आरोप करायचे आणि कोर्टात गेल्यावर..."; नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

    27-Sep-2024
Total Views |

Rane & Raut
 
 
मुंबई : सकाळी उठून खोटे आरोप करायचे आणि कोर्टात गेल्यावर माफी मागायची, एवढंच संजय राऊतांचं काम आहे, असा हल्लाबोल भाजप नेते नितेश राणेंनी संजय राऊतांवर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर केलेल्या खोट्या आरोपांमुळे कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. याचा अर्थ संजय राऊत सकाळी उठून जे आरोप करतात त्यामध्ये काहीही तथ्य नसतं. काल कोर्टात संजय राऊतांच्या वकिलांनी त्यांना अटक करू नये, म्हणून अक्षरश: हातपाय जोडले. संजय राऊत बाहेर येऊन मात्र मोठ्या छातीठोकपणे बोलत होते. जर त्यांचा कुणी व्हिडीओ दाखवला असता तर ते किती घाबरट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असतं. सकाळी उठून खोटे आरोप करायचे आणि स्वत:च्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि कोर्टात गेल्यावर तिथे माफी मागत नाक रगडायचं, एवढंच ते करतात. संजय राऊत भाजप किंवा महायूतीच्या मित्रपक्षांवर जे आरोप करतात ते सगळे खोटे असतात. ते फक्त त्यादिवशीच्या बातमीपुरते असतात. त्यापलीकडे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसतं. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने यापुढे राऊतांना किती गांभीर्याने घ्यायचं याबद्दल विचार करावा," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "काँग्रेस आणि पवारांसोबत जाऊन वसुलीचे डोहाळे..."; केशव उपाध्येंचा राऊतांवर घणाघात
 
उद्धव ठाकरे आधूनिक औरंग्या!
 
संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यावर केलेल्या टीकेबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, ""अमित शाहांच्या दौऱ्यावरून राऊतांना मिरच्या लागल्या आहेत. मातोश्रीमध्ये बसलेला आधूनिक औरंग्याला लोक उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात गेल्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजानी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य आणलं त्याचप्रमाणे आम्ही या विधानसभेत महाविकास आघाडीच्या सगळ्यांचा राजकीय पराभव करून छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या टोकावर उभा करु," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.