"काँग्रेस आणि पवारांसोबत जाऊन वसुलीचे डोहाळे..."; केशव उपाध्येंचा राऊतांवर घणाघात

    27-Sep-2024
Total Views |
 
Raut
 
मुंबई : काँग्रेस आणि पवारांसोबत जाऊन वसुलीचे डोहाळे पुरवून घेतले, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली. यावर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत जाऊन अडीच वर्षाची जुलमी सत्ता मिळवून स्वतःचे वसुलीचे डोहाळे पुरवून घेतले आणि ते बंद झाल्यावर आता मराठी माणूस आणि महाराष्ट्र दिसू लागलाय? एकदिवसा आड काँग्रेस नेत्यांकडे दिल्लीच्या फेऱ्या माराव्या लागतात, तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणूस नाही का दिसत?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "विचारधारा विकून सत्ता मिळवत महाराष्ट्राला लुटून बरबाद करण्याचे तुमचे डोहाळे भारतीय जनता पक्षाने उधळून लावल्याच्या परिणामतून आलेली ही भाषा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी नरेंद्रजी मोदी, अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार निरंतर काम करत राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.