भारताच्या गुरदित सिंह वोहरा यांची 'राष्ट्रकुल युवा परिषदे'च्या उपाध्यक्षपदी निवड

    27-Sep-2024
Total Views |

Gurudit Singh Vohra

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Gurudit Singh Vohra)
भारताच्या गुरदित सिंह वोहरा यांची राष्ट्रकुल युवा परिषदेच्या (कॉमनवेल्थ युथ काऊंसिल) उपाध्यक्षपदी (पार्टनरशिप्स आणि रिसोर्सेस) नुकतीच निवड झाली आहे. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रकुल युवा परिषद ५६ देशांतील तरुणांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. गुरदित सिंह वोहरा यांच्या निवडीमुळे भारताच्या युवा नेतृत्वाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. गुरदित सिंह वोहरा सध्या मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेत सदस्य आहेत आणि आयआयटी बॉम्बेचे ते माजी विद्यार्थी आहेत.

हे वाचलंत का? : आचार्य पवन त्रिपाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षपदी

गुरदित सिंह वोहरा यांच्यासह फालित सिजारिया यांची पॉलिसी आणि एडवोकेसी उपाध्यक्ष, फरहाना भट यांची विशेष हित गट प्रतिनिधी आणि मुस्कान आनंद यांची आशिया प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या सर्वांची नियुक्ती भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. गुरदित सिंह वोहरा आणि इतर निवडलेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आगामी २१ ऑक्टोबर रोजी सामोआ येथे होणार आहे. या प्रतिष्ठित सोहळ्यात राष्ट्रकुलातील सर्व 56 सदस्य देशांचे युवा प्रतिनिधी सहभागी होतील. हा सोहळा भारताच्या जागतिक युवा नेतृत्वातील भूमिकेला आणखी बळकट करेल.
 
नव्या भागीदाऱ्या आणि संसाधनांची जुळवाजुळव
“राष्ट्रकुल युवा परिषदेच्या मंचावरून मी तरुणांसाठी नव्या भागीदाऱ्या आणि संसाधनांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेन. माझे उद्दिष्ट असे आहे की, राष्ट्रकुल देशांतील तरुणांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात आणि त्यांची जागतिक स्तरावर मजबूत ओळख निर्माण व्हावी.”
- गुरदित सिंह वोहरा