स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याची कंपन्यांना मोहिनी

    27-Sep-2024
Total Views |
 
 Feminism
 
आजकाल महिला पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करतात. स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे पूजन करण्याचा सण म्हणजेच नवरात्र, हे काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. आज स्त्रीयांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव झाली असून, त्या आता, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापनेची धुराही समर्थपणे संभाळत आहेत. कंपनीतील प्रत्येक विभागात आज महिलांचा समावेश अधिक करण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. कंपन्यांच्या महिला कर्मचार्‍यांकडे वाढत्या कलाचा हा आढावा...
 
कंपनी व्यवस्थापन क्षेत्रात महिलांची अधिक प्रमाणात निवड करून आपल्या कर्मचार्‍यांमध्ये महिला कर्मचार्‍यांंची संख्या वाढविण्याचे आव्हान, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच कंपनी व्यवस्थापनांपुढे उभे आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत विशेष प्रयत्न केले आहेत. या संदर्भात नव्यानेच प्रकाशित झालेल्या संशोधन अभ्यासानुसार, भारतीय व्यवस्थापन कंपन्यांपैकी सुमारे ६३ टक्के कंपन्या कर्मचार्‍यांची निवड करताना, महिला उमेदवारांना धोरणात्मक स्वरुपात प्राधान्य देण्यावर भर देतात. सुमारे पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण ४१ टक्क्यांवर होते. या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्याच्या कर्मचारी निवडीच्या संदर्भात महिला उमेदवारांचा प्राधान्यासह विचार करण्याच्या प्रयत्नांचा विचार व्हायला हवा.
 
राजधानी दिल्लीतील ‘वुईएस’ या कर्मचार्‍यांचा कौशल्य विकास, प्रशिक्षण-मार्गदर्शन क्षेत्रात विशेष स्वरूपात काम करणार्‍या, व्यवस्थापन सल्लागार कंपनीने केलेल्या अभ्यासावर आधारित अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानुसार सद्य स्थितीत देशातील उद्योग-व्यवसायांतील अधिकांश म्हणजे, ६३ टक्के कंपन्या, आपल्या कर्मचार्‍यांंमध्ये महिला कर्मचार्‍यांची संख्या वाढण्यासाठी व त्यांनी अधिक जबाबदारीच्या पदांवर काम करण्याची संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
याच संशोधनात सहभागी झालेल्या ८६ टक्के कंपन्यांनी त्यांच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेता, महिला-कर्मचार्‍यांमध्ये व्यवस्थापकीय गुण व नेतृत्व विकासासाठी विशेष प्रशिक्षणासारखे प्रयत्न सुरु केले आहेत, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या प्रशिक्षणसत्रांमध्ये प्रामुख्याने नेतृत्व गुण, क्षमता विकास, धोरणात्मक विचार व निर्णय, परस्पर संबंध व प्रभावी संवादक्षमता यांसारख्या विषयांवर भर दिला जात आहे.
 
आज एकीकडे प्रगत तंत्रज्ञान-संशोधन व प्रक्रियेचा अवलंब करण्यावर कंपन्यांचा भर असतानाच, नव्या बदलप्रक्रियेमध्ये महिला कर्मचारी व व्यवस्थापकांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्यावर कंपन्यांचा भर दिसून येतो. आज या क्षेत्रांत महिलाही पुरुषांच्या बरोबरीने पुढाकार घेत असून, आज उत्पादन क्षेत्रापासून अनुसंशोेधन क्षेत्रापर्यंत महिला उमेदवार सहज उपलब्ध होतात. ही बाब आता व्यवस्थापक आणि व्यवस्थापन क्षेत्रातही सकारात्मक परिणामांसह दिसून येते.
 
याचाच परिणाम म्हणून आता, प्रमुख कंपन्याच्या मुख्याधिकार्‍यांसाठी महिला कर्मचार्‍यांच्या निवडीच्या संदर्भात मार्गदर्शक तत्व प्रसारित, प्रचारित करण्यात येतात. सर्वेक्षणात नमूद केल्याप्रमाणे महिला कर्मचार्‍यांची निवड आणि विकास या मुद्द्यावर, कंपनी स्तरांवर व कंपनी अंतर्गत अनुभवांवर आधारित मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात येते. अशा सत्रांचासुद्धा आता सकारात्मक परिणाम दिसून येतो, असे मत ‘वुईएस’च्या सह-संस्थापक अनुरंजिता कुमार यांनी व्यक्त केले आहे. परिणामी काही कंपन्यांनी महिला उमेदवारांच्या मुद्द्याला व्यवस्थापन पातळीवर व धोरणात्मक स्वरुपात निश्चित केले आहे.
 
सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार, आज व्यवस्थापन पद्धती स्वरुपात महिला कर्मचार्‍यांंच्या समावेशकतेचा स्वीकार करण्यात आला आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद देणार्‍या सुमारे 51 टक्के कंपनी-व्यवस्थापनांनी, आपल्या व्यवस्थापन स्तरावरील एक प्रमुख व्यावसायिक उद्दिष्ट म्हणून कर्मचार्‍यांमध्ये विविध स्तरांवर महिलांच्या संख्यावाढीला प्रोत्साहन देणे, कर्मचारी निवडीच्या संदर्भात स्त्री-पुरुष उमेदवारांमध्ये भेदभाव न करणे, कामाच्या ठिकाणी समावेशकता या मुद्द्यांचा समावेश केला आहे. या नव्या वैचारिक कार्यशैलीचा कंपनीच्या सर्व स्तरांवर प्रसार-प्रचार करण्यासाठी, अधिकांश कंपन्या या व्यवस्थापक व व्यवस्थापन स्तरावर विशेष संवादसत्र व प्रशिक्षणाचे आयोजन करीत आहेत. या प्रयत्नांचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे हे विशेष.
 
त्याचसोबत कंपनी अंतर्गत महिला कर्मचार्‍यांनी अधिक मोठी, अधिकार व जबाबदारीची कामे करण्यासाठी, प्रशिक्षित व अनुभवी महिला कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या विशेष प्रशिक्षण सत्रांमध्ये व्यवस्थापन शैली, व्यवसायवृद्धी, प्रभावशाली संवाद, निर्णयक्षमता, नेतृत्व विकास, परस्पर संबंध इत्यादींचा समावेश केला जातो. या प्रशिक्षणाचा महिला कर्मचार्‍यांना पदोन्नतीसाठी उपयोग होतो, असा अनुभव आहे.
 
एकीकडे नव्याने कर्मचार्‍यांची निवड करताना, महिला उमेदवारांचा त्यांच्या कौशल्य व गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारेही विचार केला जातो. हे करत असतानाच आज वाढत्या संख्येत कंपनी-व्यवस्थापनांद्वारा महिला कर्मचार्‍यांच्या संदर्भात विविधता, समानता व समावेशकता या व्यवस्थापन त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. या प्रयत्नांना अधिक गतिमान करण्यासाठी, सुमारे पाच वर्षांपूर्वी ३४ टक्के कंपन्या प्रयत्नशील होत्या, तर आज हे प्रमाण सुमारे ५१ टक्क्यांवर गेले आहे. यावरुन या विषयातील व्यवस्थापनांद्वारा घेतलेले गांभीर्य सहजपणे लक्षात येते.
 
महिला कर्मचार्‍यांच्या संदर्भात प्रामुख्याने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सध्या डीबीएस बँकेअंतर्गत जागतिक स्तरावर महिला कर्मचार्‍यांची टक्केवारी ५० टक्के असून, त्यांपैकी उच्च-व्यवस्थापन श्रेणीतील महिला व्यवस्थापकांचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे हे विशेष. बँकेच्या व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, भारतात सध्या डीबीएस बँकेत महिला कर्मचार्‍यांचे प्रमाण सुमारे ३० टक्के असून, आगामी तीन वर्षांत महिलांची टक्केवारी ३५ टक्क्यांवर नेण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांच्या पूर्ततेसाठी बँकेतर्फे एका उच्चस्तरीय कार्यकारी समितीची स्थापना केली असून, या उच्चस्तरीय समितीतर्फे यासंदर्भात विशिष्ट कालावधीनंतर आढावा घेतला जातो. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मानव-संसाधन विभाग प्रमुख किशोर पोदुरी यांच्यानुसार, त्यांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम बँकेच्या व्यवस्थापनापासून व्यवसायापर्यंत सर्वदूर दिसू लागले आहेत.
 
अशाच प्रकारचे प्रयत्न आणि उपक्रम ‘डीसीएम-श्रीराम’ उद्योग समूहांतर्गत केले जाता आहेत. कंपनीने नव्या कर्मचार्‍यांची निवड करताना, विशिष्ट धोरणात्मक निर्णय घेत नव्या-जुन्या महिला कर्मचार्‍यांचा प्रशिक्षणाद्वारे विकास करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. या संदर्भात आपला अनुभव नमूद करताना ‘डीसीएम-श्रीराम’चे व्यवस्थापकीय संचालक संदिप गिरोत्रा यांनी म्हटले आहे की, महिलांच्या संदर्भातील धोरणांची निश्चिती करण्यापासून त्याच्या अंमलबजावणीच्या कामापर्यंतची जबाबदारी, उच्च-व्यवस्थापनावर सुरुवातीपासूनच ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम अल्पावधीत व स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
याशिवाय इतर बर्‍याच कंपन्या महिलांच्या संदर्भात विविधता, समानता व समावेशकता यांवर भर देऊ लागल्या आहेत. याबाबत आपापला व्यवसाय, त्याचे स्वरुप व गरजांच्या प्राधान्यांसह प्रयत्न केले जात आहेत. यातून कर्मचार्‍यांचे प्रमाण व त्यांच्या कामकाजाचा समतोल राखण्यात या कंपन्यांना यश येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
यासंदर्भातील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण यशस्वी उपक्रम म्हणून, ‘स्नॅडर इलेक्ट्रिक कंपनी’च्या पुढाकाराचा विशेष उल्लेख करावा लागेल. महिला कर्मचार्‍यांचा विकास आणि प्रगतीसाठी २०१५ पासून कंपनीमध्ये ‘ऊर्जा’ या उपक्रमाची अंमलबाजावणी यशस्वीपणे करण्यात येत आहे. आजवर या प्रयत्नांतून ‘स्नॅडर इलेक्ट्रिक कंपनी’मध्ये ९०० महिलांना विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात येऊन, त्याचा फायदा महिलांच्या विकासापासून सर्वदूर दिसून येत आहे.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
 
लेखक - दत्तात्रय आंबुलकर