नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्ताने भारतीय रेल्वे कडून नागरिकांना एक विशेष भेट देण्यात आली आहे. या दिवाळीला भारतीय रेल्वे कडून तब्बल ६००० विशेष गाड्या नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या सोबतच, १०८ गाड्यांना जास्तीचे डबे जोडण्यात आलेले आहेत. सण समारंभांमध्ये वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. वैष्णव यांनी मागील वर्षांच्या तुलनेत विशेष गाड्यांमधील लक्षणीय वाढ अधोरेखित केली आणि सांगितले की, या वर्षीच्या सणांसाठी आतापर्यंत एकूण ५,९७५ विशेष गाड्या अधिसूचित करण्यात आल्या आहेत, गेल्या वर्षी ही संख्या ४,४२९ होती.
रेल रक्षक दल
अलिकडच्या काळात, रेल्वेतील होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता, भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे झोन कडून रेल रक्षक दल या बचाव पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे बचाव पथक अवघड आणि दुर्गम ट्रॅक साइट्सवर ट्रॅकशी संबंधित दुर्घटना आणि अपघात हाताळण्यासाठी तयार केले आहे. आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, बचावकार्यासाठी हे पथक तयार असेल. रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारी या पथकात सामील होणार आहे. या पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या महानिरीक्षक ज्योती कुमार सतीजा यांनी म्हटले की रेल्वे मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत दुर्घटना झाल्यावर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात येत होते, रेल रक्षक दलच्या निमित्ताने आपण एक नवीन प्रयोग करत आहोत.