मुंबई : केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन' योजनेंतर्गत ठाणे जिह्यातील प्रोलेट्स ब्रँडला दि. २५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पॅकेजिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फूड व बिवरेज क्षेत्रात देशस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फूड प्रोसेसिंग कंपन्यांना 'Informa Markets'द्वारे 'Fi India Award' देऊन गौरविण्यात येते.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील प्रोलेट्स ह्या मिलेट्स स्टार्टअपला उत्कृष्ट पॅकेजिंगसाठी एफ.आय. इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी एएफएसटीआयचे अध्यक्ष निलेश अमृतकर, सीएसएमबीचे चेयरमन निलेश लेले, मॅरिकोचे प्रबोध हळदे यांनी मुख्य परीक्षक म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर, देशातील विविध अग्रगण्य अन्नप्रक्रिया समूह ह्यात सहभागी झाले होते.
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्याकरिता मिलेट्स(श्री धान्य / भरडधान्य) हे उत्पादन निश्चितच करण्यात आले आहे. डोंबिवली येथील मिहिर देसाई व त्यांचे सहकारी संकेत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी मिलेट्स प्रोसेसिंग मध्ये प्रॉलेट्स ह्या ब्रँड द्वारे, विविध भरड धान्य चे फूड प्रॉडक्ट्स उत्पादित करण्यास सुरुवात केली. अन्न प्रक्रिया व अन्न सुरक्षा क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण व आकर्षक पॅकेजिंगचे विशेष महत्त्व आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तंत्रज्ञान कुशल युवा वर्गाने उद्योग क्षेत्रात उतरले पाहिजे, असे मिहिर देसाई यांनी यावेळी सांगितले.