माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विश्वास
26-Sep-2024
Total Views |
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु, जनतेने जो जनादेश दिला, तो आम्ही स्वीकारला आहे. पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान गेलेल्या कालखंडामध्ये मतदारांच्या मनामधील भावना आता बदलल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जनकल्याणाच्या योजना घोषित करुन त्या प्रत्यक्ष राबविण्यात आल्या आहेत. या राबविलेल्या जनकल्याणाच्या योजनांमुळेच विधानसभेला जनतेचा कौल महायुतीच्याच बाजूने राहणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्यांची संघटनात्मक बैठक बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना दानवे बोलत होते. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभेच्या खा. स्मिता वाघ, संघटन मंत्री शिवप्रकाश, विजयकुमार गावित, विजय चौधरी, आ. श्रीकांत भारतीय, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी पक्षात एकजूटीने काम करावे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने संघटना मजबूत करुन भाजपला यश मिळवून द्यावे, अशा प्रकारच्या सूचना अमित शाह यांनी उपस्थित पदाधिकार्यांना बैठकीदरम्यान दिल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली. तसेच, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून जागावाटप निश्चित करत असल्याचे सांगत आदिवासींच्या प्रश्नावर उत्तर देताना महायुतीचे सरकार आदिवासींच्या विरोधात कोणताही निर्णय घेणार नाही, असे दानवे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
...ते ठाकरे सरकारचे अपयश
”मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाजूने भाजप आहे. भाजपच्या सत्ता काळात आम्ही आरक्षण दिले देखील होते. उच्च न्यायालयातदेखील ते टिकले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर सत्ता बदल झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ते टिकवले नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. हे ठाकरे सरकारचे अपयश आहे. भाजपची स्पष्ट भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने नेहमीच राहिली आहे,” असेही रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.