पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द.
पुणे मेट्रोसह विविध योजनांचे होणार होते उद्घाटन.
26-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार होते. परंतु मुसळधार पावासामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते.
पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेटदरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे १ हजार, ८१० कोटी रुपये खर्च आला आहे. यानंतर, सुमारे २ हजार, ९५० कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणार्या स्वारगेट-कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारकार्याची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणार्या स्मारकाच्या कार्याची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात येणार होती.
पेट्रोलियम-नैसर्गिक वायू क्षेत्रातील उपक्रमांचे लोकार्पण
पंतप्रधान पेट्रोलियम, नैसर्गिक वायू क्षेत्रातील १० हजार, ४०० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार होते. हे उपक्रम ऊर्जा, पायाभूत सुविधा, ट्रक आणि कॅब चालकांच्या सुरक्षिततेसह सुविधा, स्वच्छ प्रवास, शाश्वत भविष्यावर लक्ष केंद्रित करतील. वाहन चालवणे सुलभ करण्यासाठी, पंतप्रधान ट्रकचालकांसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पंजाबमध्ये फतेहगढ साहिब, गुजरातमध्ये सोनगढ, कर्नाटकमध्ये बेळगाव, बंगळुरु ग्रामीण या ठिकाणी महामार्गालगतच्या सुविधांचे उद्घाटन करणार होते.
तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण
महासंगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, या दौर्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येणार होते. ‘राष्ट्रीय महासंगणक अभियाना’अंतर्गत (एनएसएम) सुमारे १३० कोटी रुपये खर्चासह संपूर्ण स्वदेशी पद्धतीने हे महासंगणक विकसित करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) प्रणालीचेही पंतप्रधान उद्घाटन करणार होते. या प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, हवामानविषयक प्रणालींमधील भारताच्या संगणकीय क्षमतांची ही लक्षणीय झेप ठरणार आहे.
सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
पंतप्रधान सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार होते. या विमानतळामुळे हवाई मार्गाच्या जाळ्यात सुधारणा होऊन पर्यटक, व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना सोलापूरला सहज पोहोचणे शक्य होईल. सोलापुरात सध्या असलेली टर्मिनलची इमारत वर्षाला सुमारे 4.1 लाख प्रवासी क्षमतेसाठी पुनर्विकसित करण्यात आली आहे.
ऊर्जा स्थानकांचे उद्घाटन
पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सीबीजी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) इत्यादी ऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय एकाच किरकोळ विक्री केंद्रात पुरवण्यासाठी पंतप्रधान ऊर्जास्थानकांचे उद्घाटन करणार होते. सुवर्ण चतुष्कोन मार्ग, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गिकांसह इतर महत्त्वाच्या महामार्गांवर येत्या पाच वर्षांत सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च करून जवळपास चार हजार ऊर्जास्थानके उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांसाठी एकाच छताखाली पर्यायी इंधनांच्या पुरवठ्याची तरतूद असलेली ऊर्जास्थानके वाहतूक सुलभ करण्यास मदत करतील.
बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण
पंतप्रधान बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण करणार होते. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे २० किमी अंतरावर भारत सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत हे परिवर्तनक्षम प्रकल्पक्षेत्र ७ हजार, ८५५ एकर अशा विस्तीर्ण प्रदेशात विकसित करण्यात येत आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक जोडमार्गांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये मराठवाड्याला गजबजलेले आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ६ हजार, ४०० कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे.