‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मागील दशकात ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत विविध क्षेत्रांत स्वदेशी उत्पादन निर्मितीच्या उपक्रमांना सरकारतर्फे सर्वार्थाने बळ देण्यात आले. परिणामी, उत्पादनवाढीबरोबरच उद्योगधंद्यांचा विकास आणि रोजगारनिर्मितीलाही गतिमानता प्राप्त झाली. आज ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत शस्त्रास्त्रांपासून ते खेळण्यांपर्यंत बहुतांश स्वदेशी भारतीय उत्पादनांनी भरारी घेतलेली दिसते. त्यानिमित्ताने ‘मेक इन इंडिया’च्या या अद्वितीय प्रगतीचा आलेख मांडणारा आणि भारतीयांना नवोन्मेषाची प्रेरणा देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख...
'मेक इन इंडिया’ उपक्रमाला आज दहा वर्षे पूर्ण झाली! या उपक्रमाला घवघवीत यश मिळवून देणार्या तुमच्यापैकी प्रत्येकाला सलाम करण्याचा हा प्रसंग आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण एक अग्रणी, दूरदर्शी आणि नवोन्मेषी आहे, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘मेक इन इंडिया’च्या यशाला बळ मिळाले आहे आणि परिणामी, आपला देश जगाचे लक्ष वेधून घेत आहे आणि कुतूहलाचे केंद्र बनला आहे. हे अथक परिश्रमाचे सामूहिक अभियान आहे, ज्याने एका स्वप्नाचे एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर केले आहे.
‘मेक इन इंडिया’चा प्रभाव दाखवतो की, भारताला कुणीही थांबवू शकत नाही. आपल्यासारखा प्रतिभावान देश हा केवळ आयातदार नाही, तर निर्यातदारदेखील आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन क्षेत्रात भारताच्या प्रगतीला चालना देणे, या एका महत्त्वाकांक्षी उद्देशाने दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रयत्न होता .
मागील दशकाबाबत बोलताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्याने आपल्याला किती दूरचा पल्ला गाठून दिला आहे. ‘मेक इन इंडिया’चा ठसा सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे, त्यात अशीही क्षेत्रे आहेत, ज्यात आपण प्रभाव पाडण्याचे स्वप्नदेखील पाहिले नव्हते.
मी एक-दोन उदाहरणे देतो.
मोबाईल निर्मिती - मोबाईल फोन्स आता किती महत्त्वाचे झाले आहेत, हे आपल्याला माहीत आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे, 2014 मध्ये संपूर्ण देशात मोबाईल निर्मिती करणारे केवळ दोन कारखाने होते. आज हा आकडा 200 हून अधिक झाला आहे. आपली मोबाईल निर्यात अवघ्या 1,556 कोटींवरून तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे -ही वाढ 7500 टक्के इतकी अवाढव्य आहे. आज भारतात वापरले जाणारे 99 टक्के मोबाईल फोन्स ‘मेड इन इंडिया’ आहेत. जागतिक स्तरावर आपण दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाईल उत्पादक बनलो आहोत.
आपल्या पोलाद उद्योगाकडेच पाहा - आता आपण पूर्णतः प्रक्रिया केलेल्या पोलादाचे निर्यातदार बनलो आहोत, सोबतच 2014 पासून उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे.
आपल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राने 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून, दररोज एकत्रितपणे सात कोटी चिप्सचे उत्पादन घेण्याची क्षमता असलेल्या पाच प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक ठरलो आहोत. त्याचवेळी केवळ एका दशकात आपली क्षमता 400 टक्क्यांनी वाढली आहे. आपले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र, जे खरे तर 2014 मध्ये अस्तित्वातच नव्हते, ते आता तीन अब्ज डॉलर्स मूल्याचे झाले आहे.
संरक्षण उत्पादनांची निर्यातही एक हजार कोटी रुपयांवरून वाढून 21 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि आपण 85 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करू लागलो आहोत.
’मन की बात’च्या या कार्यक्रमाच्या एका भागात मी जोमदार खेळणी उद्योग क्षेत्राची गरज असल्याबद्दल बोललो होतो आणि त्यावर आपल्या नागरिकांनी ही बाब प्रत्यक्षात कशी साकारावी हेच दाखवून दिले. गेल्या काही वर्षांत आपली निर्यात 239 टक्क्यांनी वाढली असल्याचे आणि त्याचवेळी आयातीत निम्म्याने घट झाली असल्याचे आपण अनुभवले आहे. यामुळे विशेषत: आपल्या स्थानिक उत्पादकांना आणि विक्रेत्यांना लाभ झाला आहे, लहान मुलांना तर निश्चितच झाला आहे.
आपल्या देशाची ओळख बनलेल्या अनेक बाबींपैकी असलेल्या मुख्य बाबी म्हणजे, आपली ‘वंदे भारत’ रेल्वे गाडी, ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाईल फोन. या सगळ्यांवर आता अभिमानाचा ‘मेक इन इंडिया’चा शिक्का लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंतचे हे यश भारतीय कल्पकता आणि गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करत आहेत.
‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम विशेष आहे, याचे कारण म्हणजे, यामुळे गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाने त्यांना ते साधन संपत्तीचे निर्माते बनू शकतात, हा आत्मविश्वास दिला आहे. या उपक्रमाचा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रावर पडलेला प्रभावही तितकाच दखल घेण्याजोगा आहे. सरकार म्हणून आम्ही हे चैतन्य अधिक बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची दशकभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे.
उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन - ‘पीएलआय’ योजना परिवर्तनक्षम ठरल्या आहेत. त्यांनी हजारो-करोडोंची गुंतवणूक शक्य केली असून, लाखो नोकर्या निर्माण केल्या आहेत. व्यवसाय करण्यात सुलभता आणण्यात आम्ही लक्षणीय पावले टाकली आहेत.
भारताला अनुकूल बरेच काही आज घडते आहे - लोकशाही, लोकसंख्या आणि मागणीचे आम्ही परिपूर्ण मिश्रण आहोत. जागतिक पुरवठा साखळीमध्ये कळीची भूमिका बजावण्यासाठी जे जे आवश्यक ते आमच्याकडे आहे, व्यवसायातील विश्वासार्ह भागीदार म्हणून आज भारताकडे पाहिले जाते. अभूतपूर्व युवा शक्ती आमच्याकडे आहे, तिचे यश स्टार्टअप जगतात सर्वांसमक्ष आहे. एकूणच, गती भारताला अनुकूल आहे. जागतिक महामारीसारखी अनपेक्षित आव्हाने येऊनही भारताच्या वाढीची वाटचाल सातत्यपूर्ण राहिली आहे. आज, आमच्याकडे जागतिक वाढीचा प्रेरक म्हणून पाहिले जात आहे. मी माझ्या युवा मित्रांना पुढे येण्याचे, ‘मेक इन इंडिया’त सहभागी होऊन नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन करतो. सर्वोत्कृष्टतेसाठी आपण सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दर्जेदार पुरवठ्यासाठी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. ‘शून्य त्रुटी’ हा आपला मंत्र असला पाहिजे.
एकत्रित होऊन आपण केवळ स्वतःच्या गरजांची पूर्तता करणारा भारतच नव्हे, तर जागतिक उत्पादन आणि नवोन्मेषाचे ऊर्जाघर असलेला भारत घडवू शकतो!
नरेंद्र मोदी, मा. पंतप्रधान