मुंबई : पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात मोठ्या कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. यंदाच्या दिवाळीत गुंवतणूकदारांना आयपीओजमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीपासून ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत ५० हजार कोटींहून अधिक किमतीचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) बाजारात येण्यास सज्ज झाले आहेत.
दरम्यान, देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया २५ हजारांहून अधिक किमतीचा आयपीओ लाँच करणार आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ म्हणून ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओकडे पाहिले जाते. यासोबतच फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी ११,६०० कोटी रुपयांचा आयपीओ आणि १०,००० कोटी रुपयांचा एनटीपीसी ग्रीन आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
देशातील बड्या कंपन्यांच्या आयपीओंमुळे यंदाच्या दिवाळी गुंतवणूकदारांसाठी खास असणार आहे. दिवाळी सणाच्या काळात तब्बल ५० हजारांहून अधिक किमतीचे तीन मोठे आयपीओ बाजारात येणार असून गुंतवणूकदारांना मोठी संधी यानिमित्ताने मिळणार आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)ने नुकतीच या कंपन्यांना आयपीओकरिता मंजुरी दिली आहे.
फुड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी स्विगीच्या आयपीओच्या संदर्भातील तपशील गोपनीय आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी प्रवर्तकांकडील सुमारे ६,६६४ कोटी रुपयांचे समभाग आणि ३,७५० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई मोटरर्ससह स्विगीला देखील आयपीओसाठी सेबीची मान्यता मिळाली आहे.