'सिंघम देवाभाऊ' मुळे राज्यातील महिला सुरक्षित!" नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

    26-Sep-2024
Total Views |
 
Rane & Raut
 
मुंबई : आमचे देवाभाऊ सिंघम आहेत. कारण देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळे राज्यातील माताभगिनी सुरक्षित फिरू शकतात, असा पलटवार भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "बदलापूरमधील आरोपीचा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जो एन्काऊंटर केला त्याचं समर्थन करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मिरच्या झोंबल्या आहेत. ते मोकळेपणाने त्या नराधमाची बाजू घेत आहेत. त्यांच्या नसानसांत देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष एवढा भरलेला आहे की, आज महाराष्ट्रातील माताभगिनींना मिळालेल्या न्यायापेक्षाही तो द्वेष मोठा वाटतोय. आमचे देवाभाऊ आहेत सिंघम. कारण देवाभाऊ गृहमंत्री असल्यामुळे राज्यातील माताभगिनी सुरक्षित फिरू शकतात. त्यांच्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास देवाभाऊ त्यांना जागेवर ठेवणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच संजय राऊत सकाळी उठून बडबड करत होते," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  संजय राऊतांना जामीन मंजूर!
 
ते पुढे म्हणाले की, "बलात्काराबद्दल कोणी बोलावं याची चौकट असायला हवी. संजय राऊतांवर आजही डॉ. स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याचा आणि त्यांना छळण्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी महिला अत्याचाराबद्दल आणि बलात्काराबद्दल बोलू नये. महाराष्ट्रात सिंघम होण्यासाठी स्पर्धा आहे ही चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या महाविकास आघाडीमध्ये शक्ती कपूर बनण्याची स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा कधी थांबेल हे आधी सांगा," अशी टीकाही त्यांनी केली.