उद्धव ठाकरे राऊतांचा राजीनामा घेणार का? आशिष शेलारांचा सवाल

    26-Sep-2024
Total Views |

Raut
 
 
मुंबई : उद्धव ठाकरे संजय राऊतांचा राजीनामा घेणार का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. संजय राऊतांना मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली.
 
आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊतांनी राजीनामा द्यायला हवा. उद्धवजी संजय राऊतांचा राजीनामा घेणार का? हा माझा सवाल आहे. रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत. त्या संजय राऊतांना डच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे. न्यायालयाने एका महिलेची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांना दोषी ठरवत शिक्षा दिली आहे. त्यामुळे महिलांची बदनामी करणारे व्यक्ती संपादकपदी बसू शकतात का? ते राज्यसभेचे नेतृत्व करू शकतात का? याचं उत्तर उबाठा सेनेने द्यावं. महिला सुरक्षा आणि महिलांची बदनामी ह्या विषयांवर जर उबाठा सेना संवेदनशील असेल तर संजय राऊतांचा राजीमाना घेईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण..."; संजय राऊतांवर भाजपची टीका
 
गुन्हेगाराची बाजू घेण्याचं महापाप मविआ करतंय!
 
ते पुढे म्हणाले की, "अक्षय शिंदेसारख्या गुन्हेगाराची बाजू घेण्याचं महापाप महाविकास आघाडी करत आहे. अजूनही एसआयटी काम करत आहेत. यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ते काम सुरु आहे. तर मग कुणालातरी वाचवण्याचा विषय कुठून आला? पोलिसांनी मुख्य आरोपीला ठोकला आणि महाविकास आघाडीचे नेते कोल्हेकुई करत आहेत. त्यामुळे अक्षय शिंदेच्या माळा जपणारी महाविकास आघाडी लक्ष भटकण्यासाठी आणि एसआयटीच्या कामात हस्तक्षेप करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.