आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' म्हणाले, “माणूस म्हणून त्रास...”

    25-Sep-2024
Total Views |

big boss  
 
 
मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन ६ ऑक्टोबर रोजी संपणार असून आता अधिक कठिण बिग बॉसचा खेळ होत चालला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी घरात निक्की तंबोळी आणि आर्या जाधवमध्ये जे गंभीर प्रकरण घडलं त्यामुळे आर्याला घराबाहेर जावं लागलं होतं. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड केतन माणगावकर यांनी मोठा खुलासा केला आहे.
 
नवशक्तिला दिलेल्या एका मुलाखतीत केतन म्हणाले की, "मेकर्स म्हणून आम्ही खूप त्रयस्थपणे या गोष्टीकडे बघितलं. आज जे स्पर्धक या शोमध्ये आहेत त्यांना आम्हीच कास्ट केलंय. त्यामुळे निक्की आणि आर्या दोघीही आमच्यासाठी समान आहेत."
पुढे ते म्हणाले की, "पण जेव्हा अशी काहीतरी घटना होते तेव्हा माणूस म्हणून त्रास होतो. मेकर्स म्हणून सांगायचं तर हा एक आंतरराष्ट्रीय शो आहे. इंटरनॅशनल शो असल्याने याचे काही नियम आहेत. तुम्ही कोणावर हात नाही उचलू शकत, हा या शोचा मूलभूत नियम आहे. कारण हा शेवटी आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचा शो आहे. आपल्यालाही राग येतो, पण त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणाला तरी माराल. त्यामुळे तुम्ही ठरवून कानाखाली माराल, हे चुकीचं आहे. नियमात तिकडे स्पष्ट लिहिलं आहे की, कोणावर हिंसा केली तर ती व्यक्ती घराबाहेर जाईल. त्यामुळे आम्हाला नियम पाळणं गरजेचं आहे."
 
"दुसऱ्या सीझनमध्ये अशी घटना झाली होती तेव्हा आपण पराग कान्हेरेला थेट बाहेर काढलं होतं. आर्याला बाहेर काढायचं की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही वेळ घेतला. या टीममध्ये बरेच वरिष्ठ व्यक्ती म्हणजेच केदार शिंदे, प्रथमेश देसाई वगैरे होते. मग आम्ही जे इंटरनॅशनल नियम आहेत ते पुन्हा वाचले. बिग बॉस फॉरमॅटच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. Endemol च्या मॅनेजमेंटसोबत चर्चा झाल्यानंतर जे नियम होते त्यानुसार आर्याला घर सोडावं लागेल. सो त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई केली", असे म्हणत त्यांनी बिग बॉसची बाजू मांडली.