वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र?
भाजप खासदाराकडून जेपीसीला आलेल्या पत्रांची चौकशी करण्याची मागणी
25-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाच्या संयुक्त संसदीय समितीस (जेपीसी) आलेल्या पत्रांमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र दिसत असून या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी समितीचे सदस्य आणि भाजप खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी केल्याचे समजते. वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करणाऱ्या जेपीसीने देशभरातून नागरिकांची मते मागविली होती. मते पाठविण्याची मुदत बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी संपली आहे. प्राप्त माहितीनुसार, समितीस १ कोटी २५ लाख पत्रे प्राप्त झाली आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने पत्रे प्राप्त होणे हे षडयंत्र असल्याचा संशय खासदार निशिकांत दुबे यांनी व्यक्त केला आहे.
खासदार दुबे यांनी याप्रकरणी जेपीसीचे अध्यक्ष खासदार जगदंबिका पाल यांनी पत्र लिहिले आहे. गंभीर जेपीसीला मिळालेल्या १ कोटी २५ लाख पत्रांची भाषा एकसारखी असून त्यात हे विधेयक तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या माध्यमातून ही पत्रे लिहिली असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावर नियंत्रण ठेवले जात असून देशातील वातावरण बिघडवण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचले जात आहे. असे असल्यास तो राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोका असल्याचे दुबे यांनी पत्रात म्हटले आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात आयएसआय, चीन आणि जमात-ए-इस्लामी बांगलादेश आणि तालिबानसारख्या कट्टरपंथी संघटनांसह विदेशी घटकांचा सहभाग असू शकतो, अशी शंकाही खासदार दुबे यांनी व्यक्त केली आहे. यामागे आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटना आहेत, ज्यांना देशाची व्यवस्था नष्ट करायची आहे. फरारी इस्लामिक कट्टरतावादी झाकीर नाईक आणि इतर लोक वक्फ दुरुस्ती विधेयकाद्वारे आपल्या देशातील तरुणांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि त्यांना सरकारच्या विरोधात वळवण्याचा कट रचत असल्याचा आरोपही खासदार दुबे यांनी केला आहे.