पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा; विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पुणे मेट्रोसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी

    25-Sep-2024
Total Views |
pm narendrra modi on maharashtra tour


नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पुणे येथे भेट देणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून स्वारगेटला जाणाऱ्या मेट्रो रेल्वेला झेंडा दाखवून ते या सेवेची सुरुवात करतील. त्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या हस्ते 22,600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात येईल.


 

पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे 1,810 कोटी रुपये खर्च आला आहे. यानंतर, सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या स्वारगेट-कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार कार्याची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्याची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात येईल.

महासंगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येईल. राष्ट्रील महासंगणक अभियानाअंतर्गत (एनएसएम) सुमारे 130 कोटी रुपये खर्चासह संपूर्ण स्वदेशी पद्धतीने हे महासंगणक विकसित करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) प्रणालीचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असून, हवामानविषयक प्रणालींमधील भारताच्या संगणकीय क्षमतांची ही लक्षणीय झेप ठरेल.

पंतप्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 10,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करतील. हे उपक्रम ऊर्जा, पायाभूत सुविधा, ट्रक आणि कॅब चालकांची सुरक्षितता आणि सुविधा, स्वच्छ प्रवास आणि शाश्वत भविष्यावर लक्ष केंद्रित करतील. वाहन चालवणे सुलभ करण्यासाठी, पंतप्रधान ट्रक चालकांसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पंजाब मध्ये फतेहगढ साहिब, गुजरात मध्ये सोनगढ, आणि कर्नाटकमध्ये बेळगावी आणि बंगलोर ग्रामीण, या ठिकाणी महामार्गालगतच्या सुविधांचे उद्घाटन करतील.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सीबीजी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) इत्यादी ऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय एकाच किरकोळ विक्री केंद्रात पुरवण्यासाठी पंतप्रधान ऊर्जा स्थानकांचे उद्घाटन करणार आहे. सुवर्ण चतुष्कोन मार्ग, पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गिकांसह इतर महत्त्वाच्या महामार्गांवर येत्या 5 वर्षांत सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च करून जवळपास 4,000 ऊर्जा स्थानके उभारण्यात येणार आहेत. ग्राहकांसाठी एकाच छताखाली पर्यायी इंधनांच्या पुरवठ्याची तरतूद असलेली ऊर्जा स्थानके वाहतूक सुलभ करण्यास मदत करतील.

पंतप्रधान सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करतील. या विमानतळामुळे हवाई मार्गाच्या जाळ्यात सुधारणा होऊन पर्यटक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना सोलापूरला सहज पोहोचणे शक्य होईल. सोलापुरात सध्या असलेली टर्मिनलची इमारत वर्षाला सुमारे 4.1 लाख प्रवासी क्षमतेसाठी पुनर्विकसित करण्यात आली आहे.

पंतप्रधान बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण करणार आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे 20 किमी अंतरावर भारत सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत हे परिवर्तनक्षम प्रकल्प क्षेत्र 7,855 एकर अशा विस्तीर्ण प्रदेशात विकसित करण्यात येत आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक जोडमार्गांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पामध्ये मराठवाड्याला गजबजलेले आर्थिक केंद्र बनवण्याची क्षमता आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 6,400 कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे.