ठाणे : भिवंडीत गणेश विसर्जनादरम्यान दगडफेक करून गणेश मूर्तीची विटंबना करीत हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून हिंदु समुदायावरच गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि साधु संत संतप्त झाले आहेत. या पाश्वभूमीवर बुधवारी विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली साधु संतांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. तसेच, आठ दिवसात गणेश भक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधुसंतासह लाखो हिंदुत्ववादी भिवंडीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंजारपट्टी नाका येथे गणेश विसर्जनच्या मिरवणुकीवेळी काही धर्माध मुस्लिमांनी दगडफेक करून श्रीगणेश मूर्तीची विटंबना केली होती. यावेळी पोलिसांकडून हिंदु समाजाला टार्गेट करत लाठीचार्ज केला होता. तसेच गुन्हेही दाखल केल्याने या संदर्भात विश्व हिंदु परिषद, कोकण प्रांतच्या नेतृत्वाखाली साधुसंतांनी बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर, साधुसंतांनी शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद घेऊन, पोलिस प्रशासनाच्या उफराट्या कारभाराचा पाढा वाचला.
तसेच, भिवंडीत गणेश भक्तांवर दाखल केलेले गुन्हे आठ दिवसात मागे घ्यावेत, अन्यथा भारतभरातील तमाम साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी मंडळी भिवंडीत धडकुन आंदोलन छेडतील. असा इशारा देण्यात आला. या पत्रकार परिषदेला,स्वामी भारतानंद महाराज, स्वामी शिवरूपानंद सरस्वती, परागबुवा रामदासी, स्वामी शिवगीरी महाराज, महंत चिदानंद महाराज यांच्यासह अनेक साधुसंतासह विश्व हिंदु परिषदेचे राजेश कुंटे,आशुतोष तिवारी, वैभव महाडिक, दादा गोसावी आदी उपस्थित होते.
भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्याना पोलिसांनी निघुन जाण्यास सांगितले होते. हिंदु समाजाच्या कार्यकर्त्याना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचे प्रकार घडले. तर पोलीस प्रशासन म्हणतात, लहान मुलांनी दगड मारले असावेत. मग या दगडफेकीमागे कोण आहे ? असा सवाल करून साधुसंतांनी पोलीस उपायुक्त पराग मणेरे व श्रीकांत परोपकारी यांच्या आदेशाने गणेश भक्तांवर चारवेळा लाठीचार्ज केला. गणेश विसर्जनासाठी जमलेल्या हिंदु समुदायावर लाठीचार्ज होण्याची कदाचीत राज्यातील पहिलीच घटना असावी आणि ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. असा आरोप केला. तर अखिल भारतीय संत संप्रदाय समितीचे महामंत्री भारतानंद महाराजांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
दादा गोसावी सारख्या गोरक्षक मानवतावादी कार्यकर्त्याला आतंकवादी संबोधता ? जे साधुसंत मानवतावादी काम करीत आहेत त्यांनाच कोठडीत डांबण्याचे काम केले जात आहे. केवळ हिंदु समुदायालाच टार्गेट केले जात आहे.शांतताप्रीय असताना हिंदुना वेठीस धरले जात आहे. तेव्हा, आता सहन करणार नाही, आठ दिवसात १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा भारतभरातील तमाम साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील.पोलीस प्रशासनाकडून अशाच स्वरूपाची भूमिका कायम राहिल्यास हिंदु समाजाला स्वाभिमान, आत्मसम्नान आणि देशहितासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल. याची महाराष्ट्र सरकार व भिवंडीतील प्रशासनाने दखल घ्यावी. असा इशाराही साधुसंत मंडळींनी पत्रकार परिषदेत दिला.
जिहाद्यांना वचक बसावा यासाठी कायदे हवेत
मागील काही काळापासून हिंदु महिला, मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढुन पळवुन नेण्याचे, त्यांचे जबरी धर्मातर करण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पिडितेचा बचाव करण्यास गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर जिहादी मानसिकतेतुन जीवघेणा हल्ला झाला होता. तेव्हा, केंद्र सरकारला आवाहन करतो की, समान नागरी कायदा लागु करा. धर्मातरण विरोधी कायदा, लव्ह जिहाद कायदा तसेच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागु करा. असेही साधुसंतानी स्पष्ट केले.
बांग्लादेशचे विभाजन करा
बांग्लादेशात सध्या सुरु असलेल्या राजकिय रणकंदनात तेथील हिंदुवर अत्याचार होत आहेत. बांग्लादेशात हिंदु अल्पसंख्याकांवर अन्याय सुरु आहे. नवरात्रीच्या पुजेच्या आयोजनासाठी तेथे पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे, बांग्लादेशचे विभाजन करून वेगळा हिंदु देश निर्माण करा. अशी सूचना साधु - महंतांनी केली.
सर्वच हिंदु देवस्थाने हिंदुकडे सोपवा
तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात भेसळ करून हिंदुंच्या भावनांशी खेळणाऱ्याना फाशीची शिक्षा द्या. तिरुपतीच्या देवस्थानात काम करणारे सर्व कर्मचारी हिंदु असताना त्यांच्यावरील मुख्य व्यवस्थापक इसाई जातीचा का नेमला आहे. असा प्रश्न उपस्थित करून, स्वामी भारतानंद महाराजांनी हे बंद करून सर्व हिंदु देवस्थाने हिंदुकडेच सोपवावीत. अशी मागणी केली.