मुंबई : अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर आणि तिचा नवरा मोहसिन अख्तर यांच्यात दुरावा आला असून त्यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आठ वर्षांपूर्वी मोहसिनसोबत लग्नबंधानत अडकलेल्या उर्मिलाने प्रेमासाठी धर्म आणि वयाचे बंधन देखील झुगारले होते. इतकंच नव्हे तर आपल्या करिअरची किंवा लोकांचीही पर्वा केली नव्हती. पण अखेर ८ वर्षांचा संसार अखेर मोडणार असून उर्मिला किंवा मोहसिन या दोघांनीही याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यांच्या विभक्त होण्याचे कारण देखील समोर आले नाही.
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. तर 'हिंदुस्तान टाईम्स'नुसार उर्मिला आणि मोहसिन यांचा घटस्फोट परस्पर अटींवर होत नसल्याचं म्हटलं आहे. उर्मिला आणि मोहसिन यांच्यात बऱ्याच काळापासून अडचणी असून दोघेही गेल्या काही काळापासून एकत्र राहत नसल्याचे देखील बोलले जात आहे.
काश्मिरी असलेला मोहसिन अख्तर हा उर्मिलापेक्षा १० वर्ष लहान आहे. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक असून त्याने झोया अख्तरच्या 'लक बाय चान्स' चित्रपटात अभिनयही केला आहे.